मुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या आहेत. तर अनके ठिकाणी टेकडीवर ही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधलेली आहेत. अशा ठिकाणांना भूस्खलन आणि जमीन किंवा डोंगराला भेगा पडण्याची शक्यता आहे. तसेच अशा वस्त्यांना मोठा धोका असल्याचा निष्कर्ष जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने काढलेला आहे. मुंबई महापालिकेने मुंबई मधील झोपडपट्ट्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया कडून हे सर्वेक्षण करून घेत आहे.
या सर्व्हेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील भांडुप, विक्रोळी पार्क साइट, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, जोगेश्वरी आणि चेंबूर या ठिकाणी धोका संभवतो. मुंबईत कित्येक ठिकाणी नागरिकांनी अशा उंच डोंगरावर, उतारावर वस्त्या निर्माण केलेल्या आहेत. त्या वस्त्यांची भौगोलिक स्थिती काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जीआयएसला विनंती केली होती. त्यानुसार हे सर्वेक्षण सुरू झालेला आहे. संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. वेळोवेळी या सर्वेक्षणाचा अहवाल महानगर पालिकेला सादर होत आहे . यावेळी 435 पानांचा अहवाल जनतेसाठी खुला करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणामध्ये मुंबईतील जमिनीची प्रत, जमिनीच्या उताराची मजबुती, जमिनीतील खडकांचे प्रमाण, भेगांची स्थिती आधी बाबींचा अभ्यास येथे करण्यास सुरूवात झालेली आहे. या वस्त्यांमधील सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? हे तपासण्यात येत आहे. सन 2006 ते 2016 या कालावधीत पडलेला सरासरी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली त्या ठिकाणची परिस्थिती याचाही विचार या सर्वेक्षणामध्ये करण्यात येत आहे.
मुंबईतील 46 वस्त्यांना दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. तर 20 वस्त्या या अतिधोकादायक स्थितीत असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये वाढलेली झोपडपट्टी, अतिक्रमण, डोंगरावर बांधलेली घरं, झाडांची झालेली कत्तल, बांधकाम यासाठी केलेले उत्खनन हे धोकादायक ठरू शकतो यामुळे जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो असंही अहवालामध्ये म्हटलेलं आहे. या अहवालामुळे मुंबई महापालिकेला मुंबईतील झोपडपट्टी ची नेमकी स्थिती काय आहे? याची अधिकृत माहिती प्राप्त होणार आहे. मागील वर्षी झालेल्या पावसाळ्यात या परिसरातील झोपडपट्ट्यांचा मोठे नुकसान झालेला आहे. या परिसरातील जमिनी खचल्या असून अनेक घरांना भेगा ही गेलेल्या आहेत, अशा अवस्थेतही या परिसरात नागरिक राहत आहेत. असाच पाऊस जर येणाऱ्या पावसाळ्यात पडला तर मात्र उंच डोंगरावर असणाऱ्या या झोपडपट्ट्या पाण्याबरोबर वाहून जातील असा धोकाही व्यक्त होत आहे.
अहवालामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच सावट
प्रभाकर शेट्टी म्हणाले, या परिसरात गेली चाळीस वर्षे मी राहत आहे. कोणत्याही पद्धतीच्या या ठिकाणी सुविधा नाहीत. डोंगराच्या कडेला तर काही जणांनी डोंगराच्या उतारावर घरे बांधलेली आहेत. तसं आम्ही जीव मुठीत घेऊनच या परिसरात राहत आहेत. या संपूर्ण वस्त्यांमध्ये सर्व श्रमिक - कामगार वर्ग राहत आहे. मागील पावसामुळे या परिसरात जमिनींना आणि घरांनाही भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही कुठे राहायला जायचं ? असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे .
अशोक तावडे म्हणाले, या झोपडपट्टीमध्ये गेली पंधरा वर्षाहून अधिक काळ मी कुटुंबीयांसोबत राहत आहे. परिस्थिती नसल्यामुळे झोपडपट्टीचा आधार घ्यावा लागला हे खरं आहे. पण आता महापालिकेच्या अहवालात आमच्या झोपड्या ही धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल आल्यामुळे आमच्यावर डोंगर कोसळल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत राहायला जागा नाही. स्वतःचे घर घ्यायला पैसे नाहीत. अशा स्थितीत आम्ही या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहे. आता जर या झोपडपट्ट्यांना धोका निर्माण झाला, तर आम्ही जायचं कुठे ?महापालिकेने त्यांचा विचार करून आमचं पुनर्वसन करावं अशी आम्ही मागणी करत आहे.
Ajit Pawar | जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला? 'झोपु' कार्यालयावरुन अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावलं | स्पेशल रिपोर्ट