मुंबई : मोठा गाजावजा करुन सुरू केलेली आणि नंतर अनेक वेळा अडखळलेल्या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरू होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, वडाळा ते सातरस्ता या मार्गावर धावणारी मोनो मुंबईकरांच्या फारशा पसंतीला उतरली नाही. आता मात्र, तोट्याच्या गर्तेत गेलेल्या मोनोला पुन्हा उभारी देण्यासाठी 'एमएमआरडिए'कडून एक नवी शक्कल लढवली जात आहे. गर्दी नसलेल्या वेळेत मोनोचे डबे वाढदिवस, लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचे ठरवले आहे. लवकरच याबाबत अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे. मुंबईतल्या बेस्टटच्या निलांबरीसारखीच ही योजना असून मोनो रेलची ही जॉय राईड आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.


एमएमआरडीए प्रशासनाने गर्दीचे तास वगळता मोनोचे डबे वाढदिवस, लग्न आदी खासगी कार्यांसाठी भाड्याने देण्याचे नियोजन केले आहे. बेस्टतर्फे व्यावसायिक कामांसाठी बसेस भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. तर, गुजरात तसेच नोएडा मेट्रोमध्ये अशी सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेतल्याचे कळते. सध्या या निर्णयाबाबत अधिकारीवर्गात प्राथमिक चर्चा सुरू असून, केवळ तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.


मोनो रेल उभारणीचा खर्च 2700 कोटी इतका होता. मोठाच गाजावाजा करुन सुरू केलेली आणि नंतर डब्ब्यात गेलेली मोनो फायद्यात आणायची असेल. तर मोनोचे डब्बे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय खरंच मोनोसाठी फायद्याचा ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



मोनो का आणि कशी तोट्यात?


प्रतिदिन एक लाखाहून अधिक प्रवाशांची ने-आण करण्याचे ध्येय ठेवलेल्या मोनो रेलतर्फे सध्या 97 फेऱ्या चालवल्या जात आहेत.


जेमतेम 9 ते 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मोनोरेलची बहुतांश स्थानके ही निवासी भागापासून बरीच दूर असून, सार्वजनिक वाहतूक सेवेसोबत थेट जोडलेली नाहीत.


या स्थानकांतून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना वेगळी कसरत करावी लागते. परिणामी, प्रवासी मोनोने जाणे टाळत असल्याने एमएमआरडीएला दिवसाकाठी साडेआठ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.


मोनोचा पहिला टप्पा तोट्यात जात असताना, पूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मोनो रेल निश्चितच 'धावेल' ही सर्वसामान्यांना दाखवलेली खोटी आशा देखील फोल ठरते आहे. दुसरीकडे मोनोच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या दोन गाड्यांची प्रतीक्षा आणखी काही काळ करावी लागणार आहे.


महिना उत्पन्न/प्रवासी संख्या


मार्च 2019 96.29 लाख/ 5.55 लाख


एप्रिल 2019 74.64 लाख/4.03 लाख


मे 2019 75.11 लाख/3.97 लाख


जून 2019 76.03 लाख/4.04 लाख


जुलै 2019 41.28 लाख/2.13 लाख


ऑगस्ट 2019 50.79 लाख/2.57 लाख


सप्टेंबर 2019 ६३.37 लाख/3.15 लाख


ऑक्टोबर 2019 56.93 लाख/2.88 लाख


नोव्हेंबर 2019 57.61 लाख/2.88 लाख


डिसेंबर 2019 60.41 लाख/3 लाख


जानेवारी 2020 55.52 लाख/2.75 लाख