Ganpati Visarjan 2023 Live : पुढच्या वर्षी लवकर या... मुंबईसह राज्यभरातील बाप्पांना आज निरोप

Maharashtra Ganpati Visarjan 2023 Live : अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Sep 2023 09:10 PM
Ganpati Visarjan : ठाण्यातील मानाचा गणपती वागळेचा राजावर पुष्पवृष्टी

Ganpati Visarjan : ठाण्यातील मानाचा गणपती असलेल्या वागळेच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. 

Dhule Ganpati Visarjan 2023 : धुळे शहरात विसर्जनावर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी

धुळे शहरातील मानाच्या खुनी गणपतीचे जुने धुळे भागातील खुनी मज्जिद जवळ मुस्लिम धर्मीय बांधवांकडून पुष्पवृष्टी करून तसेच आरती करून स्वागत करण्यात आले. गेल्या 128 वर्षांची ही परंपरा आजही कायम असून दरवर्षी ही मिरवणूक मस्जिदजवळ आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम धर्मीय बांधवांकडून गणरायाचे याठिकाणी स्वागत केले जाते. हे स्वागत झाल्यानंतर थोड्याच वेळात खुनी गणपतीचे विसर्जन होणार आहे.

Ganpati Visarjan : मुंबईतील पहिल्या गणपतीची पारंपारिक पद्धतीने मिरवणूक

Ganpati Visarjan : मुंबईतील पहिला गणपती अर्थातच गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीच्या गणपतीची अगदी पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणून काढण्यात आली. 

Ganpati Visarjan : परळच्या राजावर पुष्पवृष्टी

Ganpati Visarjan : श्रॉफ बिल्डिंगजवळ परळच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. 

Ganpati Visarjan : सुतार गल्ली बाप्पा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आला

सुतार गल्ली बाप्पा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ हे गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आलेले आहेत. ही 25 फुटाची मूर्ती असून यावेळी या मंडळांनी पंचमुखी हनुमानची मूर्ती थीम तयार केली आहे. त्याचबरोबर या मंडळा सोबत काही मुस्लिम कार्यकर्ते सुद्धा विसर्जनासाठी आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला विसर्जनाच्या माध्यमातून एकटेच एक संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. 

Anant Chaturdashi 2023 Live Updates : अहमदनगरच्या तालयोगी प्रतिष्ठानकडून घरगुती बाप्पांचे एकत्रित विसर्जन

Anant Chaturdashi 2023 Live Updates : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ ही जवळ आली आहे. गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या प्रथा परंपरा याचा आपल्या जातात. अशाच पद्धतीने अहमदनगरच्या तालयोगी प्रतिष्ठान हे दरवर्षी घरगुती गणपती विसर्जन करत असते. विशेष म्हणजे केवळ अकरा रुपये फी घेऊन ते घरगुती बाप्पाची भव्य मिरवणूक काढतात. त्यात शिवसूर्य मर्दानी, साज लेझीम आणि झांज पथक, हलगी पथक यांचा समावेश असतो. सकाळपासून बाप्पाच्या मूर्तीचे संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत घरगुती गणपतीचे संकलन केले जाणार आहे. जवळपास 500 बाप्पाच्या मूर्ती संकलन करुन त्याची शहरातून भव्य मिरवणूक जाणार आहे. यंदाचे नववे वर्ष आहे.

Ganpati Visarjan : अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; 49 गणपती आणि सात आखाड्यांचा सहभाग

Ganpati Visarjan : अकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीच्या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचं हे 129 वं वर्ष आहे. मिरवणुकीत 49 गणपती आणि सात आखाड्यांचा सहभाग आहे. अकोल्यात आज सकाळपासूनच गणेश विसर्जनाला उत्साहात सुरुवात झाली आहे. अकोल्यातील गणेश उत्सवादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Anant Chaturdashi 2023 Live Updates : जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरु

Anant Chaturdashi 2023 Live Updates : जळगाव शहरातील मानाचा गणपती म्हणून मनपाचा गणपती मानला जातो. या गणपतीची मिरवणूक सुरु झाल्यानंतरच इतर मंडळाच्या गणपतीची मिरवणूक त्यामागे निघतात. आज देखील अतिशय उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली आहे. यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ढोल वाजवताना तर मनपा आयुक्त विद्या गायकवाड आणि भाजपा आमदार सुरेश भोळे हे फुगड्या खेळून फेर धरताना पाहायला मिळाले आहे.

Ganapati Visarjan 2023 Live : अहमदनगरच्या तालयोगी प्रतिष्ठानकडून घरगुती बाप्पांचे एकत्रित विसर्जन

Ganapati Visarjan 2023 Live : गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या प्रथा परंपरा. अहमदनगरच्या तालयोगी प्रतिष्ठान हे दरवर्षी घरगुती गणपतींचं विसर्जन करत असते. विशेष म्हणजे केवळ अकरा रुपये फी घेऊन ते घरगुती बाप्पाची भव्य मिरवणूक काढतात. त्यात शिवसूर्य मर्दानी, साज लेझीम आणि झांज पथक, हलगी पथक यांचा समावेश असतो. सकाळपासून बाप्पाच्या मूर्तीचे संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत घरगुती गणपतीचे संकलन केले जाणार आहे. जवळपास 500 बाप्पाच्या मूर्ती संकलन करुन त्याची शहरातून भव्य मिरवणूक कफहली जाणार आहे. यंदाचे नववे वर्ष आहे.

Anant Chaturdashi 2023 Live Updates : नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक दुपारी तुळशीबार परिसरातून निघणार

Anant Chaturdashi 2023 Live Updates : नागपूरचा राजाची विसर्जन मिरवणुक आज दुपारी तुळशीबाग परिसरातून निघणार आहे. त्यापूर्वी नागपूरचा राजाच्या मंडपात आज सकाळी बाप्पांची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. नागपूरचा राजा गणपती उत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेले 27 वर्ष नागपूरचा राजाची तुळशीबाग परिसरात स्थापना केली जात आहे. नागपूर शहरापासून 20 किमी अंतरावरील कोराडीच्या तलावात नागपूरच्या राजाचे आज संध्याकाळी विसर्जन केले जाईल.

Ganesh Visarjan 2023 : बुलढाण्यातील लाकडी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

बुलढाणा जिल्ह्यातील मानाचा खामगाव येथील लाकडी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात


मानाचा लाकडी गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाल्याशिवाय जिल्ह्यात इतरत्र कुठेही मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होत नाही


थोड्याच वेळात खामगावसह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकाना सुरुवात होणार

नंदुरबारमध्ये 217 सार्वजनिक तर घरगुती गणपती बाप्पांना आज निरोप, ग्रामीण भागात सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

Ganpati Visarjan : नंदुरबार जिल्ह्यात 217 सार्वजनिक गणेश मंडळाचे तर अनेक खाजगी गणेश मंडळाच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून ग्रामीण भागात सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. तळोदा शहरात क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणुकीत अकरा पथकांच्या शिस्तबद्ध पण तितक्याच थरारक कसरतींनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. मंडळाने नेहमीप्रमाणे गुलाल विरहित मिरवणूक काढून पर्यावरणरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देखील यानिमित्ताने दिला. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष करत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला जात आहे.

Ganapati Visarjan 2023 Live : सोलापुरात घरगुती गणपती विसर्जनासाठी 14 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था

Ganapati Visarjan 2023 Live : यंदाचे गणेश विसर्जन पर्यावरण पूरक व्हावे यासाठी सोलापूर महानगरपालिकेने जय्यत अशी तयारी केली आहे. सोलापूर शहरात असलेल्या एकही तलावात गणेश भक्तांना थेट विसर्जन करता येणार नाही. त्याऐवजी घरगुती गणपती विसर्जनसाठी शहरात 14 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. तर चार फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन दगडी खाण येथे करण्यात येणार आहे. ज्या भाविकांना मूर्ती दान करायचे आहेत, त्यांच्यासाठी शहरातील विविध भागात एकूण 83 संकलन केंद्र असणार आहेत. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर तलाव, हिप्परगा तलाव या ठिकाणी भाविकांनी थेट तलावमध्ये विसर्जन करु नये असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून तलावाच्या परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून कपडा देखील लावण्यात आले आहे. सोलापुरात विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दीड हजार महानगरपालिकेचे कर्मचारी, सफाई दूत तसेच तब्बल 2200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. 

Anant Chaturdashi 2023 Live Updates : कोल्हापूरच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

Anant Chaturdashi 2023 Live Updates : कोल्हापूरच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती बाप्पा हा मानाचा गणपती आहे. खासबाग मैदानापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मानाच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु झाल्यानंतर शहरातील विसर्जन मिरवणूक सुरु होते.

Ganapati Visarjan 2023 Live : मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ठिकठिकाणी राजावर पुष्पवृष्टी

Ganapati Visarjan 2023 Live : मुंबईच्या राजाच्या अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. राजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज, संवेदनशील भागात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कलम 144 लागू

Ganpati Visarjan : बुलढाणा जिल्ह्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे. जिल्ह्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी 2500 पोलीस, १५०० होमगार्ड व एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी तैनात करण्यात आलेली आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान खामगाव शहरातील काही भागात कलम 144 सुद्धा लागू करण्यात आली आहे. तर संपूर्ण मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक समाजकंटकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडकडे यांनी केलेला आहे.

Ganapati Visarjan 2023 Live : मिरजमध्ये सकाळपासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार

Ganapati Visarjan 2023 Live : सांगली आणि खासकरुन मिरजमधील गणपती मंडळाचा विसर्जन मिरवणुक सोहळा पार पडणार आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मिरजमध्ये सकाळपासून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. मिरजमधील विसर्जन मिरवणूक सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मिरजेत तैनात करण्यात आला आहे.

Anant Chaturdashi 2023 Live Updates : कोल्हापुरात आज सकाळपासून गणपती विसर्जनाला सुरुवात
Anant Chaturdashi 2023 Live Updates : कोल्हापुरात सार्वजनिक गणेश विसर्जनाला आज सकाळपासून सुरुवात होईल. सकाळी 9 वाजता मानाचा तुकाराम माळी गणेश मंडळाचा गणपती विसर्जनासाठी बाहेर पडेल. यानंतर संध्याकाळच्या सुमारास गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल.
Ganesh Visarjan Miravnuk : पुण्यातील विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरु होणार

Ganesh Visarjan Miravnuk : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला साडेदहा वाजता सुरुवात होईल. महात्मा फुले मंडईसमोर पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून विसर्जन मिरवणूक सुरु होईल.  पहिले पाच मानाचे गणपती बेलबाग चौकात येऊन लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होतील. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा साडेचार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 

Ganpati Visarjan :विसर्जनासाठी ठाणे सज्ज; शहरातील प्रमुख ठिकाणावर चोख बंदोबस्त; ठाणे जिल्ह्यात 18 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनानिमित्त ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. ठाण्यातील सात महत्त्वाचे विसर्जन घाट या ठिकाणी हे वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. तसेच पर्याय मार्ग देखील सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे आज बाप्पाचे विसर्जनासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच आज ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्माचा सण आहे. निमित्त देखील जुलूस निघणार आहे. त्याबाबत देखील पोलिसांनी खबरदारीचे उपाययोजना केल्या आहेत. 

पार्श्वभूमी

Mumbai- Maharashtra Ganesh Visarjan 2023 Live Updates : अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) मुंबई महापालिकेने (BMC) यंदाही जय्यत तयारी केली आहे. गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी असणार आहेत. गणेश भक्तांच्या सोयीसाठी 71 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी 198 कृत्रिम तलावही तयार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरही मोठी जबाबदारी गणेश विसर्जनाच्या दिवशी असते. गणेश विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी ऑनलाईन करता येणार आहे. 


पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला साडेदहा वाजता सुरुवात होईल. महात्मा फुले मंडई समोर पालक मंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून विसर्जन मिरवणुक सुरु होईल. पहिले पाच मानाचे गणपती बेलबाग चौकात येऊन लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होतील. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यावेळेस साडेचार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 


अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त असणार आहे. सोबतच, शहरातील गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही विशिष्ट मार्ग आज बंद असणार आहे. सकाळी 7 वाजेपासून तर गणेश विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तर, मिरवणूक मार्गावर भाविक व वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन, नागरिकांच्या सुरक्षितता, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून हे बदल करण्यात आले आहेत. 


नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Visarjan) सार्वजनिक मंडळासह महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मनाच्या गणपतींसह सर्वच मंडळांचा विसर्जन मिरवणुकीचा क्रम ठरला असून या मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी मिरवणूक मार्गावर जवळपास 70 कॅमेरे लावण्यात आले आहेत, तर चार ड्रोनद्वारे मिरवणूक मार्गावर (Ganesh Visarjan MIrvanuk) पोलीस लक्ष ठेवून असणार आहे. 


सार्वजनिक गणेश विसर्जनाला कोल्हापुरात आज सकाळपासून सुरुवात होईल. आज सकाळी 9 वाजता मानाचा तुकाराम माळी गणेश मंडळाचा गणपती विसर्जनासाठी बाहेर पडेल. कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, कोल्हापूरचे पोलीस प्रमुख, शासकीय अधिकारी यांची उपस्थिती या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत असते. यानंतर संध्याकाळच्या सुमारास गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल. सांगली आणि खासकरुन मिरजमधील गणपती मंडळाचा  विसर्जन मिरवणुक सोहळा पार पडणार आहे. अनंत चतुर्दशी दिवशीच्या निमित्ताने मिरजमध्ये सकाळपासून विसर्जन  मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. मिरजमधील विसर्जन मिरवणूक सोहळ्याला कोणताही गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आज मिरजेत तैनात करण्यात येतो.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.