एक्स्प्लोर
मुंबईत रोटी बँकेला माजी पोलीस महासंचालकांकडून मोलाची मदत
शहरात उरलेलं जेवण गरजू उपाशी लोकांना मिळावं यासाठी 2 वर्षांपूर्वी रोटी बँकेची स्थापना करण्यात आली होती. आज माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी डबेवाल्यांच्या मोहिमेला हात देत 3 वाहनं उपलब्ध करुन दिली आहेत, ज्यांचा खर्च ते स्वत: उचलणार आहेत.
मुंबई : मुंबईसारख्या शहरांमध्ये विविध सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्तीचं जेवण बनवलं जातं. पार्टी संपल्यावर उरलेलं सारं जेवण कचऱ्याच्या डब्यात जातं. मात्र हेच जेवण गरजू उपाशी लोकांना मिळावं यासाठी 2 वर्षांपूर्वी रोटी बँकेची स्थापना करण्यात आली होती. आज माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी डबेवाल्यांच्या मोहिमेला हात देत 3 वाहनं उपलब्ध करुन दिली आहेत, ज्यांचा खर्च ते स्वत: उचलणार आहेत.
सुभाष तळेकर यांनी दोन वर्षांपूर्वी मांडलेल्या या संकल्पनेचा मुंबईच्या डबेवाल्यांनी स्वीकार केला आणि दोनशेहून जास्त डबेवाले हे काम करण्यासाठी स्वत:हून पुढे आले. मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरु केलेली ही मोहीम गेली 2 वर्षं सुरु आहे. दरदिवशी रोटी बँकेला जवळपास 20 ते 25 फोन येतात, शनिवारी आणि रविवारी हा आकडा जवळपास 50 च्या घरात जातो. दररोज 300 लोकांची तर शनिवार रविवारी जवळपास 600 गरजू उपाशी लोकांची भूक या रोटी बँकेच्या माध्यमातून भागवली जाते.
रोटी बँकेच्या या कामासाठी डबेवाले सायकलींचा वापर करत होते, मात्र सायकलने जेवणाचं वाटप करण्यात अडचणी येत होत्या. माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी तीन गाड्या पुरवल्याने रोटी बँकेचं काम आता सुकर होणार आहे.
या गाड्या प्रामुख्याने दक्षिण मुंबई, मुंबई पूर्व उपनगर, मुंबई पश्चिम उपनगरात कार्यरत असतील. या गाड्यांवर काम करण्यासाठी स्वयंसेवकही असणार आहेत, जे प्रामुख्याने सायंकाळी 4 ते रात्री 12 या वेळेत काम करणार आहेत.
तुमच्या घरी किंवा समारंभात जेवण उरल्यास थेट मुंबई रोटी बँकेची हेल्पलाईन 8655580001 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.rotibankindia.org या वेबसाईटला भेट द्या. 24 तास ही सेवा उपलब्ध असेल, असे माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी लोकांना आवाहन केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement