मुंबई : मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्याच्याच खात्यातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण 33 अधिकाऱ्यांविरोधात 27 कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 


मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारी नंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भष्टाचाराचा आरोप करून मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परमबीर सिंह हे 2015 ते 2018 याकालावधीत ठाणे पोलीस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे.


पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावरच नाहीतर त्यांच्या कुटुंबावरही अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार, परमबीर सिंह यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचसोबत परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याची माहितीही या पत्रातून देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे मुलाच्या सिंगापूरमधील व्यवसायात गुंतवले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. 


दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर आरोपांचं सत्र सुरुच आहे. यापूर्वी मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनीही परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.  याच तक्रारीच्या अनुषंगाने परमबीर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत. परमबीर सिंह यांची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :