मुंबई : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत ( 3 मार्च 2020  रोजी दुपारी 12 वाजे पर्यंत) 10 लाख लाभार्थींचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी ही योजना विना अडथळा आणि गतिमान पद्धतीने सुरु केल्याबद्धल सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला,आणि माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास तसेच इतर अधिकारी आणि तंत्रज्ञांचे अभिनंदनही केले.


आपापर्यंत पोर्टलवर 35 लाख 809 कर्जखाती अपलोड केली आहेत. तर 21 लाख 81 हजार 451 जाहीर झालेली कर्जखाती आहेत. शेतकऱ्यांकडून 10 लाख 3  हजार 573 आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत 7 लाख 6 हजार 500 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 4 हजार 807 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे गडचिरोली, अमरावती,यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, नाशिक या 6 जिल्ह्यांतील 5 लाख कर्जखात्यांची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पहिली यादी : (चाचणी स्वरुपात) 24 फेब्रुवारी रोजी : 68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची

दुसरी यादी : 28 फेब्रुवारी रोजी : 15 जिल्ह्यातील 21 लाख 81 हजार कर्जखात्यांची

कर्जमुक्ती योजनेतील लक्षणीय बाबी :
ठाकरे सरकारने केलेल्या या कर्जमाफीमध्ये काही लक्षणीय बाबी आहे. या कर्जमाफीकरता या केवळ 28 दिवसांत पोर्टल सुरु झाले. महाआयटी तर्फे संपूर्णपणे स्वत: विकसित असं हे सॉफ्टवेअर आहे. यासाठी कुठल्याही खासगी व्हेंडरचा समावेश नाही.

उच्च क्षमतेचे सर्व्हर आणि क्लाऊड तंत्रज्ञान पोर्टलसाठी उपयोगात आणल्याने 80 हजारापेक्षा जास्त आपले सरकार सेवा केंद्र व बँका यांना विना अडथळा आधार प्रमाणीकरण शक्य होत आहे. प्रतिदिन 4  लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पोर्टलद्वारे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

यामध्ये मराठीचा पूर्ण वापर होत आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी मराठीत तसेच प्रमाणीकरण व तक्रार नोंद पावती सुद्धा मराठीतच आहे.  सहकार विभाग, महसूल विभागावार योजनेची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.  माहिती तंत्रज्ञान विभागाने यासाठी अविरत तांत्रिक सपोर्ट दिला आहे.

प्रशिक्षण व्हिडीओ, सहज समजेल अशा प्रशिक्षण पुस्तिका यामुळे सर्व स्तरावर यशस्वी प्रशिक्षण ठरले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे, पाहा -