मुंबई : महिलांच्या अधिकारांसाठी गेली अनेक वर्ष लढा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात त्यांच्याच सुनेनं कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. डॉ. गौरी चव्हाण यांनी तिचे पती, दिर, जाऊ, सासू विद्या चव्हाण आणि सासरे अशा चौघांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आमदार विद्या चव्हाण यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप फेटाळून लावत, नवरा-बायकोच्या वादात आपल्याला ओढल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.


16 जानेवारीला डॉ. गौरी यांनी मुंबई पोलिसांत  दाखल केलेल्या तक्रारीनुसार विलेपार्ले पोलिसांनी नुकताच हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 498 ए( कौटुंबिक हिंसाचार), 354 (महिलेचा विनभंग), 504 (अवमानकार बोलणे), 506 (धमकावणे), 34 (एकापेक्षा अधिक लोकांनी सामुहिकरित्या एकाच गुन्ह्यात सामील असणे) या कलमांअंतर्गत विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

डॉ. गौरी यांनी आपल्याला दुसरी मुलगी झाली झाली म्हणून सासरच्या मंडळींनी आपला छळ सुरू केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला आहे. कौटुंबिक हिंसाचारासोबत विद्या चव्हाण यांच्या दुसऱ्या मुलानं आपला विनयभंग केल्याचा आरोपही त्यांनी या तक्रारीत केला आहे.

विद्या चव्हाण यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच डिसेंबर 2019 मध्ये आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं लक्षात येताच आपल्या मुलानं तिच्याकडे घटस्फोट मागितला. सुनेचा बिघडलेला मोबाईल जेव्हा दुरूस्तीसाठी पाठवला होता तेव्हा त्यातील मेसेज मुलाच्या हाती पडले. याबाबत तिच्याकडे विचारणा केली असता तिनं आपल्या वकिलामार्फत हा बनाव रचण्यास सुरूवात केली. मात्र हे सारे आरोप खोटे असून हा महिलांच्या न्याय हक्कांसाठी बनवलेल्या कायद्याचा दुरूपयोग असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा आपला मुलागा आणि सुनेच्या दरम्यान असलेला त्यांचा वैयक्तिक वाद असून विनाकारण यांत सा-या कुटुंबाला गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.