मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियापासून हाकेच्या अंतरावर चार दिवसांपूर्वी स्फोटक असलेली गाडी ठेवण्यात आली होती. मात्र यामागे कोण आहे? याचा पत्ता अद्याप लागू शकला नाही. 700 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. 10 पोलीस पथकं तयार करण्यात आली. राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणा सज्ज झाल्या तरी अजून या मागचा मास्टर माईंड कोण आहे? हे मात्र कळू शकलं नाही.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर रस्त्यावर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पहिला पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता, तो म्हणजे स्कॉर्पिओ पार्क करतानाचं सीसीटीव्ही फुटेज. ज्या व्यक्तीने कार पार्क केली होती, तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता. त्याने मास्क घातला होता, तर डोके हुडीने झाकलेले होते. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नव्हती. मात्र हाच प्रश्न आज 4 दिवसानंतर सुद्धा कायम आहे. केंद्रीय तपास यंत्रणा NIA सुद्धा या प्रकरणी चौकशी करत आहे. मात्र त्यांच्या हाती सुद्धा अद्याप काही लागलं नाही. काल 'जैश उल हिंद' या संघटनेच्या माध्यमाने टेलिग्रामवर एक पोस्ट करून या प्रकरणाची जबाबदारी घेण्यात आली. मात्र संध्याकाळ पर्यंत 'जैश उल हिंद'ने हे कृत्य केलं नसून आमच्या नावाचा वापर केल्याची एक पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


काल जैश उल हिंद या संघटनेनं त्यांच्याकडून अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यासंदर्भात जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे मग या संघटनेचं नाव घेऊन पोलिसांना चकवा देण्याचं तर काम नाही ना असाही सवाल उपस्थित होतोय.


निवृत्त आयपीएस अधिकारी पीके जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी 4 दिवसांपूर्वी सापडली होती. या घटनेमागे कोण आहे? याचा तपास सुरु असतानाच धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेने टेलिग्रामच्या अकाउंटवरून अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर स्फोटके असलेली गाडी ठेवल्याची जवाबदारी स्वीकारली आहे. या पत्राद्वारे त्यांनी बिटकॉइनमार्फत पैशाची मागणी केली असून मोनेरोमार्फत पैसे पाठवण्यासाठी अकाउंट नंबरही दिला आहे. गाडी सापडली तेव्हा त्यात एक पत्रही सापडलं होतं आणि आज आलेले पत्र या बद्दल पोलीस तपास करीत आहेत, या पत्राबद्दल पोलिसांनी काही भाष्य करण्यास नकार दिला असला तरी सर्व बाजूने तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. तरी हे किती खरे आहे? कारण काहीजण प्रसिद्धीसाठी ही जबाबदारी उचलत असतात असे जैन यांनी सांगितले.


या 4 दिवसांच्या पोलिस तपासातून काय निष्पन्न झालं?




  • पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी 10 पथके तयार करण्यात आली.

  • ज्यामध्ये मुंबई पोलीस, मालमत्ता कक्ष, गुन्हे विभाग, दहशतवादी विरोधी पथक यांचा समावेश आहे.

  • गाडी ज्याने ठेवली तो इसम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. जे नंतर पोलिसांना सापडलं.

  • ज्या गाडीचा वापर केला गेला ती चोरीची होती आणि त्याच्या मूळ मालकाची पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला.

  • 700 पेक्षा अधिक सीसीटीव्ही पोलिसांनी आतापर्यंत तपासले आहेत.

  • ज्या-ज्या वेळेला गाडी ज्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसली त्या ठिकाणांचे मोबाईल लोकेशन काढले गेले असून त्याद्वारे सुद्धा तपास सुरु आहे.

  • गाडीमध्ये ज्या जिलेटीनच्या काड्या सापडल्या त्या नागपूरच्या एका कंपनीमध्ये बनवण्यात आल्या होत्या.

  • पोलीस आता इनोव्हा गाडीचा शोध घेत आहेत, जी स्कॉर्पिओ सोबत होती.

  • पोलिसांचा तपास युद्ध पातळीवर सुरु असून या कटाच्या मागे कोण आहेत, याचा शोध ते घेत आहेत. प्रत्येक बाबींची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. लवकरच यामागे नेमकं कोण आहे? आणि हे करण्या मागचं काय कारण आहे? हे सर्व स्पष्ट होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :