मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) आजपासून सुरु झालं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळावरील नियुक्त्या केल्या जाव्यात अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची 12 नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं म्हटलं. त्यावरुन विधानसभेत वातावरण चांगलंच पेटलं.


अधिवेशनावर कोरोनाचं सावट, विधानभवनाशी संबंधित 25 जण कोरोनाबाधित


काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जसं मराठवाडा, विदर्भ विकास झाला पाहिजे तशी इतर भागांचाही विकास झाला पाहिजे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विकास मंडळ झालं पाहिजे. त्याचा ठराव दिल्लीला पाठवला आहे, त्याचा विचार झाला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याच्या विचारत आहे. मंडळं करणार आहोत त्या बाबत राजकारण करण्याचा विचार करू नका. याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा केली आहे. मंडळ आहेत असं गृहीत धरून निधी वाटप झालं पाहिजे. यासाठी अधिकचा निधी देऊ, असं ते म्हणाले. अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची 12 नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं म्हटलं.


विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका


12 आमदारांकरता विकास मंडळं ओलीस ठेवली : विरोधी पक्षनेते फडणवीस
अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची 12 नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं म्हटल्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले की, सभागृहात राज्यपालांबाबत अशी चर्चा करत येते का? 12 आमदारांकरता विकास मंडळं ओलीस ठेवली. हे किती राजकारण आहे. दादांकडून ही अपेक्षा नाही. आज अजित दादांच्या ओठावर आलं. राज्यपाल पक्षाचे नसतात. मराठवाडा, विदर्भ सरकारला माफ करणार नाही. आमची मागणी ही भीक नाही आम्ही भिकारी नाही. हे हक्काचे आहे, ते घेतल्याशिवाय राहणार नाही. अजित दादांनी जे म्हटलं त्याचा निषेध करतो, असं फडणवीस म्हणाले.


काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
याव विषयावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळावर नियुक्त्या करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, भारतात सगळ्यात जास्त वाघ विदर्भात आहेत. विदर्भाच्या जनतेचा अपमान करू नका. सरकारचा निषेध करत आम्ही सभात्याग करतो असं ते म्हणाले.