मुंबई : भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.
मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं.
स्फोटकांनी भरलेली कार आणि अंबानीच्या कारचा नंबर सारखाच?
अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयालाही याबाबत कळवण्यात आलं आहे. आता राज्य आणि केंद्रीय यंत्रणा या प्रकरणी तपास करणार असल्याचं कळतं. महाराष्ट्र सरकारने मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाची विचारपूस करुन सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं.
गरज पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू : शंभूराज देसाई
"वाहनाचा रंग घालवलेला आहे. वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. स्फोटकं का ठेवली यांच्या मूळाशी आम्ही जाऊच. पण तपास सुरु असल्याने सध्यातरी भाष्य करणं चुकीचं आहे. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचं कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल," अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिली.
गुन्हे शाखेकडून तपास सुरु
मला या प्रकरणाची माहिती आताच मिळाली आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा करत आहे. लवकरच सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.