Ed Raids :अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेनेच्या 'या' पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीचा छापा
ED Raids Anil Parab : शिवसेना अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्या घरीदेखील ईडीने छापा मारला आहे.
ED Raids Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. अनिल परब यांच्यासह मुंबईतील आणखी एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीने छापा मारला आहे. अंधेरीतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
संजय कदम हे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय कदम हे अंधेरी पश्चिम शिवसेना विभाग संघटक आहेत. संजय कदम यांच्या घरी सकाळी 6.30 वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीकडून कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच संजय कदम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमा होऊ लागले आहेत.
आयकर विभागाने मारला होता छापा
संजय कदम यांच्या घरी दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडून छापा मारण्यात आला होता. आयकर विभागाने संजय कदम यांच्या घरी दोन दिवस आणि दोन रात्र छापेमारी केली होती. या छापेमारीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजय कदम यांच्या घरातून काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली होती.
आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान 'अजिंक्यतारा' आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. अनिल देशमुख यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे सह-संचालक तासीन सुलतानदेखील अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान 'अजिंक्यतारा' येथे चौकशीसाठी दाखल झाले आहेत.
>> ईडीकडून या ठिकाणी छापा
1. अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ
2. मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व
3. अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी इडी छापे.
4. दापोलीतील साई रिसॉर्ट
5. दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी
6. दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय
7. शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांचे निवासस्थान, अंधेरी
>> पुण्यात ईडीची कारवाई
अनिल परबांनी पुण्यातील विभास साठे यांच्याकडून दापोलीतील रिसॉटसाठी जमीन खरेदी केली होती. याच पार्श्वभूमीवर या जमीन व्यवहाराच्या तपासासाठी ईडीचं पथक पुण्यात पोहोचलंय. साठे यांच्याकडून1 कोटी 10 लाखाला रिसॉर्टसाठी जमीन खरेदी केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केलाय.