कल्याण : एकीकडे रस्ते अपघात वाढत असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलीस आणि शासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. परंतु त्यानंतरही नागरिक काही ऐकण्याचे किंवा नियम पाळण्याचे नाव घेत नसल्याने, कल्याण वाहतूक पोलिसांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. आज कल्याणच्या दुर्गाडी चौकाजवळ वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडूनच पोलिसांनी जनजागृती करत वेगळी शिक्षा दिलेली पाहायला मिळाली.


सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे असे प्रकार वाहन चालक सर्रासपणे करत असल्याचे दिसतात. वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी अखेर वेगळ्या पद्धतीने त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. 


वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांच्या हाती दंडाचे चलान न देता वाहतूक नियम पाळण्याबाबत संदेश देणारे बॅनर हातामध्ये देऊन 15  मिनिटे उभे राहण्याची शिक्षा करण्यात आली. कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही माहिती दिली. त्यानुसार अनेक वाहन चालक हातामध्ये नियम पाळण्याचे संदेश घेऊन भर उन्हात उभे राहिलेले दिसून आले. किमान या शिक्षेनंतर तरी आता नागरिक वाहतुकीचे नियम पाळतील अशी अपेक्षाही वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या