Mumbai BEST Strike : मुंबईत बेस्टच्या कंत्राटी बस चालकांनी आजही काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदाराने वेतन न दिल्याने बस चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारीदेखील तीन आगारातील बस चालकांनी अचानक संप केल्यामुळे गुरुवारी बेस्टच्या प्रवाशांचे हाल झाले. 


आज सकाळपासून वडाळा, वांद्रे आणि विक्रोळी या आगारातील कंत्राटी बस चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. एम. पी. ग्रुपच्या कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या 175 बसगाड्या वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. परंतु कामगारांचे वेतन न दिल्यामुळे वडाळा वांद्रे आणि विक्रोळी या आगारांमधून आज एकही बस गाडी आगाराबाहेर निघाली नाही. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. 


प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून 86 बसेस या चालवल्या आहेत. काम बंद आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसल्याने बेस्ट प्रशासनाने कंत्राटदाराविरोधात करारातील अटींनुसार कारवाईचे संकेत दिले आहेत. 


गुरुवारीदेखील संप


कंत्राटदार कंपनीनं वेतन वेळेवर न दिल्यानं चालकांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. वडाळा, कुर्ला, वांद्रे आगारातील  भाडेतत्वावरील बेस्ट बस चालकांनी हा संप पुकारला. या संपाच्या परिणामी  दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालयमार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. 


भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन सुरु केलं आहे.  बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली.  बेस्ट प्रशासन बेस्टचे इतर नियमित कामगार नेमून बेस्ट बस सेवा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.


मागील काही महिन्यांपासून कंत्राटी बस चालकांना वेळेवर पगार मिळत नाही. वाढलेल्या महागाईत घर चालवणे अधिक आव्हानात्मक असल्याचे कंत्राटी बस चालकांनी म्हटले. पगार मिळाल्यानंतर काम सुरू करणार असल्याचा पवित्रा चालकांनी घेतला आहे.