झटपट डिलिव्हरी (Delivery Boy) करण्यासाठी अनेकवेळा डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियम मोडले जातात. ऑनलाइन मागविण्यात आलेले खाद्यपदार्थ लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी स्विगी (Swiggy), झोमॅटो (Zomato), डॉमिनोज पिझ्झा (Domino's Pizza) तसेच इतर कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयमध्ये स्पर्धा लागलेली आहे. उशीर टाळण्यासाठी आणि अधिकाधिक ठिकाणी डिलिव्हरी करता यावी यासाठी डिलिव्हरी बॉय प्रचंड घाईत गाडी चालवतात. प्रत्येक डिलिव्हरीसाठी कंपनीकडून कमिशन दिले जात असल्याने अधिक कमाई करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे अनेकवेळा ते नो एंट्रीमध्ये ही गाडी टाकतात. यामुळे अनेकवेळा अपघात होण्याची शक्यात असते. डिलिव्हरी बॉयच्या या बेशिस्त वागणुकीला मुंबईतील अनेक नागरिक वैतागले आहेत. मात्र आता या बेशिस्त डिलिव्हरी बॉयना शिस्त लावण्यासाठी स्वतः मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) हे मैदानात उतरले आहेत.    


रविवारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना त्यांनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवरून भाष्य केलं आहे. यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्राफिक आणि मुंबईत बेशिस्तपणे गाडी चालवणारे डिलिव्हरी बॉय. मुंबई पोलीस आयुक्तांनी यावेळी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना डिलिव्हरी बॉयना आणि त्याशी संबंधित कंपन्यांना इशारा दिला आहे.   


पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले आहेत की, ''माझ्याकडे अनेक नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी केल्या आहेत.'' ते म्हणाले, ''यापुढे डिलिव्हरी बॉयने वाहतुकीचे नियम मोडले, तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालवताना आढळ्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबधित कंपनीवर ही कारवाई करण्यात येणार आहे.'' पोलीस आयुक्तांच्या या पाऊलाने बेशिस्त डिलिव्हरी बॉयना चांगलाच चाप बसणार आहे. यासाठीच आता मुंबई वाहतूक पोलीस ही चांगलीच सज्ज झाली आहे. 


संबंधित बातम्या: