मुंबई : राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत पोहोचलं आहे. परंतु ते कुठे आहे हे समजू शकलेलं नाही. शिवसैनिकांकडून त्यांचा शोध सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. या दोघांसोबतच युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही मुंबईत पोहोचले आहेत. सकाळी रस्ते मार्गाने हे कार्यकर्ते मुंबईत आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिक आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून बडनेरा रेल्वे स्टेशनवर हजर राहणार होते. सोशल मीडियाद्वारे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आज रात्री आठ वाजता अमरावतीहून मुंबईला निघणार होते. परंतु राणा दाम्पत्य आज पहाटेच मुंबईत दाखल झालं.


नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये राणा दाम्पत्याचं बुकिंग
दरम्यान नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आज आणि उद्याचं बुकिंग केलं आहे. परंतु अद्याप राणा दाम्पत्य पोहोचलेलं नसल्याचं गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने सांगितलं. नंदगिरी गेस्ट हाऊसबाहेर शिवसैनिक हजर असून कोणत्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला मातोश्रीपर्यंत पोहोचू देणार नाही किंवा हनुमान चालीसाचं पठण करु देणार नाही, असं शिवसैनिकांनी ठणकावलं.


'वर्षा' आणि 'सिल्वर ओक'चीही सुरक्षा वाढवली
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्री या त्याच्या खासगी आणि वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानची सुरक्षाही वाढवली आहे. 


रवी राणा यांचा निर्धार
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत. संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं. मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करु, वेळ असल्यास मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला मोठ्या मनाने साथ द्यावी, असंही रवी राणा म्हणाले.


हनुमान चालीसा वाचण्यासाठी महाविकास आघाडीची परवानगी घ्यावी लागते का? असा सवालही रवी राणा यांनी उपस्थित केला. आम्ही अत्यंत श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. अनेक संकटांना सामना करण्याची आमची तयारी आहे, आम्ही जाणार म्हणजे जाणारच असा निर्धारही राणा यांनी बोलून दाखवला. रवी राणा यांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 


मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी 23 एप्रिलचा मुहूर्त 
आमदार रवी राणा 23 एप्रिलला 'मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यांच्यासोबात 600 हून अधिक कार्यकर्ते हे मातोश्रीसमोर जमणार आहेत. या आधी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने मातोश्रीसमोर गर्दी केली होती. पण राणा दाम्पत्य काही आलं नाही. आता आमदार रवी राणांचा मातोश्री समोरील हनुमान चालीसा पठणाचा मुहूर्त ठरला असून 23 एप्रिल रोजी ते मुंबईत येणार आहेत.