मुंबई : मुंबई महानगरपालिकेनं काही खाजगी डायग्नोस्टिक सेंटरच्या सहाय्यानं मुंबईत आता कोरोनासाठी ड्राईव्ह इन टेस्टचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परदेशातील अनेक फास्ट फूड मॉलमध्ये प्रचलित असलेली ही पद्धत भारतात बर्गरसाठी प्रसिद्ध असलेल्या एका आतंरराष्ट्रीय ब्रँडनं काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. यात ग्राहकाला त्याच्या गाडीत बसूनच पार्सलची ऑर्डर दिली जाते. अगदी त्याच पद्धतीनं मुंबईत आता कोरोनाच्या टेस्टही सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या भायखळा, परळ, दादर, विक्रोळी, बोरीवली, मुलूंड यांसह अनेक ठिकाणी उपलब्ध अससेल्या पालिकेच्या वाहनतळांवर हा उपक्रम सध्या सुरू आहे.


या उपक्रमाअंतर्गत गाडीत बसलेल्या व्यक्तीकडून खिडकीची काच थोडीशी खाली करून 'स्वॉप' टेस्टसाठी त्याच्या लाळेचे नमुने घेतले जातात. जेणेकरून व्यक्तीशी कमीत कमी संपर्क साधण्याचं उद्दीष्ट पूर्ण होतं. टेस्टचे नमुने 24 तासांनंतर व्यक्तीला ईमेलवर पाठवले जातात. जेणेकरून व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे का? याचं तातडीनं निदान होऊन त्या व्यक्तीवर उपचार सुरू करता येतील.

VIDEO | 'झेंडा भल्या कामाचा तू घेऊन निघाला...' मराठी कलाकारांचा सेवेकऱ्यांना गाण्यातून अनोखा सलाम
जर तुम्हाला कोरोनामुळे होणा-या कोविड 19 या संसर्गजन्य आजाराची लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांनी कोरोनाच्या चाचणीसाठी दिलेली चिठ्ठी मिळताच 1800222000 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक टोकन दिलं जाईल ज्यात तुमच्यानजीक ही टेस्ट कुठे होतेय?, याची माहिती देऊन तुम्हाला तिथं पोहचायची एक निश्चिच वेळ दिली जाईल. त्यावेळेस तुम्हाला गाडीत बसून त्याठीकाणी पोहचायचं आहे. संबंधित प्रत्येक खाजगी संस्थेनं या उपक्रमातून दिवसभरात किमान 250 टेस्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जेणेकरू जास्तीत जास्त व्यक्तींच्या टेस्ट घेऊन या रोगावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणं प्रशासनाला शक्य होईल.

कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव, राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल 


कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. कोविड 19 च्या चाचण्यांना वेग यावा यासाठी राज्य सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पूल तपासणीसाठी परवानगी मागितली आहे. पूल टेस्टिंगमध्ये एकाच वेळी दहा नुमन्यांची तपासणी होऊ शकते. जर हे शक्य झालं तर उरलेल्या लाॅकडाऊनच्या काळात वेगाने तपासण्या होण्यास मदत होईल. महाराष्ट्रात पूल टेस्टिंगमुळे तपासणीचा वेग दहा पट वाढेल. सध्या राज्यात रोज 4 ते 5 हजार तपासण्या करण्यात येत आहेत. इस्त्रायल आणि यूएसच्या काही भागात कोरोना चाचणीसाठी पूल टेस्टिंगचा वापर करण्यात आला आहे.