मुंबई : सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशावर घरी बसण्याची वेळ आली आहे. देशातले सगळे व्यवहार जागच्या जागी थांबले आहेत. अशावेळी कोरोनाशी दोन हात करत आहेत अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी. यात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस, पत्रकार आदींचा समावेश होतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना कडक सॅल्यूट करतोय. आता यात मराठी कलाकारही उतरले आहेत. एक दोन नव्हे, तर तब्बल 32 कलाकारांनी घरबसल्या तू चाल पुढं तुला रं गड्या या गीतावर व्हिडीओ करून हे गाणं बनवलं आहे. हेमंत ढोमे, समीर विद्वांस, नानुभाई जयसिंघानिया व इतरांनी एकत्रितपणे हे गाणं केलं आहे. आज सोशल मिडियावर सकाळी 11 वाजता या गाण्याचं अनावरण करण्यात आलं.

तू चाल पुढं तुला  रं गड्या भीती कशाची.. हे मूळ गाणं कुंकू या सिनेमातलं. 1937 मध्ये हा चित्रपट आला होता. शांताराम आठवले यांचं हे गीत पुढे समीर विद्वांस दिग्दर्शित डबल सीट या सिनेमात वापरण्यात आलं. ते गायलं होतं अजय गोगावले यांनी. आणि याची रचना केली होती जसराज, सौरभ, ह्रषिकेश यांचं संगीत या गाण्याला आहे. हे गाणं आता मराठी कलााकारांनी अत्यावश्यक सेवेसाठी तत्पर असलेल्या कलाकारांना सलाम करण्यासाठी वापरलं आहे.

या गाण्यात तब्बल 32 कलाकार सहभागी झाले आहेत. याच्यात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जीतेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मुक्ता बर्वे, अभिनय बेर्डे, स्पृहा जोशी, जसराज जोशी, चिन्मय मांडलेकर आदी कलाकारांचा यात समावेश होतो. प्रत्येकाने आपल्या घरातूनच हा व्हिडिओ केला आहे.

संपूर्ण गाण्यात या कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांचे फोटोज वापण्यात आले आहेत. आणि गाण्याच्या सरशेवटी सगळ्यांना मराठी इंडस्ट्रीकडून सलाम ठोकण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी कलाकारांनीही मुस्कुराएगा इंडिया या नावाने गाणं केलं होतं. त्यात अक्षयकुमार, टायगर श्रॉफ, विकी कौशल, सिद्धार्थ मेनन, क्रिती सेनन आदी कलाकार सहभागी झाले होते.



व्हिडीओ पाहा