नवी मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आडकाठी आणणाऱ्या नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी काल जोरदार हिसका दाखविला आहे. पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भाजपचे नगरसेवक आणि विद्यमान सभागृह नेते रवींद्र इथापे यांचाही समावेश आहे. पनवेलमध्ये भाजपच्या नगरसेवकाची वाढदिवसाची पार्टी वादग्रस्त ठरलेली असताना नेरुळमधील भाजपच्याच नगरसेवकाचा मॉर्निंग वॉक कारनामा उघडकीस आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले असून नागरिकांवरील निर्बंध कडक करण्यात येत आहेत. एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. सायंकाळी पाचच्या नंतर शहरातील सर्वच किराणा दुकानांचे शेटर डाऊन होत आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आव्हान महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. प्रशासकीय पातळीवर इतकी सावधगिरी बाळगली जात असताना काल 17 जण बेलापूर परिसरातील पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेले. त्यामध्ये भाजपचे नगरसेवक आणि विद्यमान सभागृह नेते रविंद्र इथापे यांचाही समावेश होता. या मॉर्निंग वॉकची माहिती मिळाल्यानंतर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी तातडीने पारसिक हिलवर धाव घेतली आणि सर्वांची उचलबांगडी करुन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. या सर्वांवर साथीचे रोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांचे दाबे दणाणले आहे.


आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवा


कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वांची एकच मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे फक्त घरात राहण्याची. सर्व नागरिकांसह लोकप्रतिनिधींही या जबाबदारीची जाणीव ठेवावी. विनाकारण रस्त्यावर येऊ नये. अन्यथा पोलिसांनी नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे.


संबंधित बातम्या : 


रेड, ऑरेंज, ग्रीन झोन घोषित केलेले नाहीत; पुढील आठवड्यात निर्णय होईल : विश्वजीत कदम


कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये विभागणी