फास्टॅगला 1 डिसेंबरलाच देशात अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, लोकांना येणाऱ्या अडचणी पाहून केंद्र सरकारने 15 डिसेंबरपर्यंत याची मुदत वाढवली होती. जास्तीत जास्त लोकांनी या कालावधीत फास्टॅग खरेदी करुन आपल्या वाहनांवर लावण्यासाठी ही मुदत वाढवल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया या अगोदरच फास्टॅगच्या नवीन सुविधेसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आता प्रत्येक टोल प्लाझावर प्रत्येक लेनमध्ये फास्टॅगद्वारे टोल घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त एक लेन हायब्रीड ठेवली आहे, जेणेकरुन मोठ्या आकाराची वाहने त्यातून मार्गक्रमण करतील.
एनएचएआयकडून प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केल्यामुळे देशाला वार्षिक 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे. यामध्ये इंधन आणि कामाच्या वेळचाही समावेश करण्यात आला आहे. सोबतच कोणत्याही टोल प्लाझावर फास्टॅग स्कॅनर खराब असेल तर त्याला वाहन चालक जबाबदार असणार नाही. डिजीटल व्यवहार वाढवण्यासाठी आणि लांबच लांब रांगातून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
फास्टॅग म्हणजे काय?
फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी - RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. रोखीने व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होणार आहे. सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्याचं ठरवलंय. इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन राखीव ठेवली जाईल. या लेनला 'हायब्रिड लेन' असं म्हटलं जाईल. फास्टॅगमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होईल.
FASTAG | राष्ट्रीय महामार्गावर आजपासून फास्टॅग अनिवार्य, फास्टॅगसाठी वेगळी मार्गिका असणार | ABP Majha