मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. याचवेळी फडणवीस यांनी सावरकरांच्या विचारांना माननाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कामांवर टीका केली.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. परंतु याचवेळी आम्हाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल खूप आश्चर्य वाटतं. कालपर्यंत ज्या शिवसेनेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल जाज्वल्य अभिमान वाटत होता. तीच शिवसेना राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर शांत आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर जी प्रतिक्रिया दिली आहे, त्याचे आम्हाला आश्चर्य वाटते.


फडणवीस म्हणाले की, शिवसेनेचे नेते म्हणत आहेत की, आम्ही जसे गांधी आणि नेहरुंना मानतो, त्याचप्रमाणे काँग्रेसनेही स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानायला हवे. शिवसेनेची ही भूमिका म्हणजे सौदेबाजी आहे. आम्ही त्यांच्या नेत्यांना मानतो म्हणून त्यांनी आमच्या नेत्यांना मानावं ही सरळ सरळ सौदेबाजी आहे. शिवसेनेची सौदेबाजी त्यांना लखलाभ.


कालपर्यंत शिवसेना सावरकरांना मानत होती. सावरकरांचा अपमान सहन करत नव्हती. सावरकरांबद्दची शिवसेनेची गेल्या पाच वर्षांतली मतं पाहा. शिवसेना सावरकरांचा अभिमान बाळगत होती. परंतु राहुल यांच्या वक्तव्यानंतर देश आणि महाराष्ट्र पेटलाय, पण शिवसेना मात्र शांत आहे. कारण शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे. हा देश राहुल यांच्या वक्तव्यामुळे त्यांना कधीच माफ करणार नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेलाही माफ करणार नाही.


फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला सावरकरांना मानावंच लागेल. सावरकर हे देशभक्त होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनीदेखील खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.


प्रकरण काय आहे?
झारखंडमधील एका रॅलीदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. देशातल्या महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवरुन राहुल गांधींनी सरकारला लक्ष्य केले होते. राहुल म्हणाले होते की, भारतीय जनता पक्ष देशात मेक इन इंडिया हा संकल्प राबवणार होता. परंतु त्यांनी मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया करुन ठेवलं आहे. या मुद्द्यावरुन भाजपच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीदेखील केली. त्यानतर काँग्रेसकडून काल (14 डिसेंबर) नवी दिल्लीत भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी माफी मागणार नाही. माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. यावरुन आता देशात मोठं वादंग उठलं आहे.