मुंबई : शिवसेना विरुद्ध राणे वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. दिशा सालियनच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या वक्तव्यांसंदर्भात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत भर पडली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. 24 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा इशारा राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना दिला आहे.


दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांनी राहुल कनाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर नितेश राणे यांनी काही ट्वीट केले होते. राहुल कनाल यांच्या 8 आणि 13 जून 2020 रोजीच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि सीडीआर तपासल्यास दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होऊ शकते. राहुल कनाल हे यासंबंधित गुन्ह्यातील जोडीदार असाही आरोप राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूवरुन राहुल कनाल यांच्यावर आरोप करणारे अनेक ट्वीट केले होते.


Rahul Kanal IT Raid : ...तर नितेश राणे राजीनामा देणार का? राहुल कनाल यांचे आव्हान 


या ट्वीटनंतर राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचं जाहीर केलं. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे की, "सोशल मीडिया हे एक जबाबदार व्यासपीठ आहे. मी कोणाच्याही बेजबाबदार ऑनलाईन गुंडगिरीपुढे झुकणार नाही. राणे यांच्या बेताल आरोपांवर कायदेशीर आधार घेत माझे वकील जोहेब शेख यांच्यावतीने मानहानीची नोटीस बजावली जाईल. शिवाय 24 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.






दरम्यान नितेश राणे यांनी माफी न मागितल्यास अब्रुनुकसानीच्या दाव्यातून मिळणारी रक्कम सालियन कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राहुल कनाल यांनी दिली.










मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय
राहुल कनाल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. आयकर विभागाने 8 मार्च रोजी त्यांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर राणे यांनी ट्वीट करत राहुल कनाल यांच्यावर अनेक आरोप केले होते.


कोण आहेत राहुल कनाल? 
राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत
मातोश्रीच्या जवळचे म्हणून राहुल कनाल यांची ओळख
युवा सेना कोअर कमिटीत राहुल कनाल आहेत 
टीम आदित्यचा एक चेहरा राहुल कनाल आहे
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांच्या नावाची होती चर्चा 
महापालिकेत शिक्षण समिती सदस्य देखील राहिले आहेत


राणे पिता-पुत्राच्या अटकपूर्व जामीनावर आज निर्णय
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दिंडोशी न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियन हिच्या मृत्यूसंदर्भात काही वक्तव्य केली होती. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल.