Rahul Kanal IT Raid : शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या मुंबईतील घरी काल आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली. दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी कनाल यांच्यावर मुंबईच्या नाईट लाईफ गॅंगचा सदस्य असल्याचा आरोप केला. तसेच ट्विट करत अनेक प्रश्नही उपस्थित केले. यावर राहुल कनाल यांनी देखील राणेंना प्रत्युत्त्र म्हणून एक ट्विट करत आव्हान दिले आहे. काय म्हणाले राहुल कनाल
...तर नितेश राणे राजीनामा देणार का?
राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर म्हणून ट्विट केलं असुन यात ते म्हणतात, सर्वोच्च यंत्रणेनं माझा सीडीआर तपासावा. पण तो केवळ 8 आणि 13 जुनचाच नाही तर संपूर्ण वर्षांचा तपासावा. त्यात जर काही आढळले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? कायम लक्षात ठेवा, देव सर्वोच्च आहे आणि कायम सत्यासोबत असतो. लोकांना फोन करतं रहा आणि आनंद घेत रहा, असा खोचक टोला त्यांनी आमदार नितेश राणे यांना कनाल यांनी लगावला आहे.
नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय
राहुल कनाल यांच्या 8 आणि 13 जून 2020 रोजीच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि सीडीआर तपासल्यास दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होवू शकते. यासंबंधीत गुन्ह्यातील जोडीदार असाही आरोप राणे यांनी केला आहे. राणे यांनी कनाल यांच्यावर मुंबईच्या नाईट लाईफ गॅंगचा सदस्य असल्याचा आरोप केला आहे. तसेच शिर्डीच्या संस्थांनावर नेमणूक करण्याइतकी त्याच्यावर कोणाची एवढी कृपादृष्टी आहे? त्याच्याकडे एवढा पैसा आला कोठून? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय
राहुल कनाल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता शिवसेनेच्या आणखी एका नेता आयकर विभागाच्या रडारवर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाड मारल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
कोण आहेत राहुल कनाल?
- राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत
- मातोश्रीच्या जवळचे म्हणून राहुल कनाल यांची ओळख
- युवा सेना कोअर कमिटीत राहुल कनाल आहेत
- टीम आदित्यचा एक चेहरा राहुल कनाल आहे
- राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांच्या नावाची होती चर्चा
- महापालिकेत शिक्षण समिती सदस्य देखील राहिले आहेत
महत्त्वाच्या बातम्या:
- BJP Protest : नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा, देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडलं
- उद्धवजी, तेव्हा बाळासाहेबांना काय उत्तर देणार?, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
- Girish Mahajan : गिरीष महाजन आणि जनक व्यास यांना हायकोर्टाचा दणका, अध्यक्षपदाच्या निवडीविरोधातील याचिका फेटाळली