ठाणे : ठाणे शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य सरकारने बंदी घातलेल्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात महापालिकेकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. होळी आणि धुलिवंदन सणाच्या निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांच्या विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत घोडबंदर आणि दिवा भागात पथकाने नुकतीच कारवाई करुन 43 हजारांचा दंड वसूल केला आहे. येत्या दोन दिवसांत नौपाडा, उथळसर, वागळे, कळवा आणि मुंब्रा परिसरात अशीच कारवाई सुरु केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका सुत्रांनी दिली आहे.
या कारवाईमध्ये पाचशे रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंत दंड आकारला जात आहे. यासाठी महापालिकेने चार विशेष पथकं तयार केली आहेत. या पथकांनी दिवा स्थानक परिसरात 55 दुकानांमध्ये कारवाई करुन 15 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तसंच दुकानदारांकडून 21 हजारांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे घोडबंदर येथील पातलीपाडा हिरानंदानी ईस्टेट भागातून 25 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून त्यांच्याकडून 22 हजारांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये पाण्याच्या फुग्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांबरोबरच इतर पिशव्यांचाही समावेश आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
दरम्यान एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत शहरातील 750 दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात कारवाई करण्यात आली. या दुकानदारांकडून दोन लाख 30 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 356 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.
होळी आणि धुळवडीला इमारतींच्या गच्चीवरुन रंग आणि पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या लोकांवर फेकण्याचे प्रमाण अधिक असते. या प्रकारामुळे अनेक दुर्घटना घडतात, शिवाय प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारा कचरा ही वेगळीच समस्या असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे.