मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेने स्वतःची वेगळी नियमावली तयार केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिका यांचा समावेश आहे. त्यामुळे एकमेकांच्या शेजारी असलेल्या या महापालिकांमध्ये वेगवेगळे नियम का? असा सवाल उपस्थित होतोय.
दोन दिवसांपूर्वीच मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली जाहीर केली. केंद्र सरकारच्या नियमावलीवर आधारित ती नियमावली असली तरी त्यात काही प्रमाणात बदल करण्यात आले. तर मुंबईच्या शेजारी ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, निजामपूर या महानगरपालिका आहेत. पण या प्रत्येक महानगरपालिकेत कोरोना संदर्भात नियम मात्र मुंबईपेक्षा वेगळे आहेत.
मुंबई महापालिका
मुंबईत इमारतीत ज्याला कोरोना झाला आहे त्याला सलग 10 दिवस घरीच राहावे लागेल. इमारतीचा मजला सील करणार की नाही याबाबत उल्लेख नाही. एखाद्या इमारतीत 10 नागरिक किंवा 20 टक्के कोरोना रुग्ण असल्यास ती इमारत सील केली जाईल. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क लोकांनी आणि लक्षणे असलेल्या लोकांनी पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोविड टेस्ट करणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचा कोणताही उल्लेख नाही.
नवी मुंबई महापालिका
ज्या इमारतीमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित घर सात दिवसांसाठी सील करण्यात येईल. त्याच मजल्यावर एका पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला सील करण्यात येईल. गृह निर्माण संस्थेतील एका इमारतीत 26 पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येईल. गृह निर्माण संस्थेत एका पेक्षा जास्त इमारती असल्यास फक्त कोरोना रुग्ण आढळलेली इमारत सील होईल. सात दिवसांचा विलगिकरण कालावधी संपल्यावरच लावलेले सील काढण्यात येईल. इतकेच नाही तर त्यांनी नियम मोडल्यास दंड लावणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. पहिल्यांदा नियम मोडल्यास 10 हजार रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास 25 हजारांचा दंड तर तिसऱ्यांदा नियम मोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड नवी मुंबई मनपा वसूल करणार आहे.
ठाणे
ठाणे महापालिकेत ज्या इमारतीतील सदनिकेमध्ये कोविड रुग्ण आहे. ती सदनिका 7 दिवसंकरिता सील राहणार आहे. ज्याला कोरोना झालाय त्याला सात दिवस घरी थांबावे लागेल. त्या व्यक्तीच्या संपर्कामधील लोकांनी पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोविड टेस्ट करणे बंधनकारक असेल. तसेच लक्षणे नसतील तरी निकट राहिलेल्या लोकांनी पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोविड टेस्ट करणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची कोणताही उल्लेख नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने नियमात आणि दंडाच्या रकमेत देखील बदल केला आहे तर भिवंडी निजामपूर महापालिकेने देखील नियमात थोडे बदल केले आहेत. ज्यांना कोरोना होतोय त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून उपचार पद्धती जाहीर केली आहे. तिचे पालन सर्वत्र एकाच प्रकारे करण्यात येते मग विलिगीकरणासाठी केंद्राने जी नियमावली दिली आहे तिचे पालन न करता प्रत्येक महापालिका वेगवेगळे नियम का बनवत आहे असा प्रश्न निर्माण होतोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Police Corona : पोलिसांना कोरोनाचा विळखा, एका दिवसात 93 पोलीस कोरोनाबाधित
- Omicron : लस न घेतलेल्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका! ऑक्सिजन बेडवरील 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण लस न घेतलेले
- Coronavirus Updates :काही दिवसात मुंबई, दिल्लीत कोरोनाचा जोर! 'सूत्र' मॅाडेलनुसार तिसऱ्या लाटेची परमोच्च पातळी 'या' काळात