मुंबई : खऱ्यायखुऱ्या जीवनातही कधीकधी सिनेमासारख्या घटना घडतात. पण त्यासाठी चमत्कार नव्हे, तर सुयोग्य मार्गदर्शन कामी येतं. असाच एक प्रकार घडला आहे मुलुंडच्या क्रिश शिरीष शाह या मुलाबाबतीत. अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी-एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता समस्या) आणि बिहेव्हिअरल इश्यूज (वर्तवणूक समस्या) यांमुळे क्रिश जेव्हा पहिली-दुसरीत होता, तेव्हा त्याला अक्षरं समजत नव्हती. बोलताना तो अडखळायचा. पण आज तोच क्रिश आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांनी उत्तीर्ण झाला आहे. वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढे त्याला एमबीए व्हायचं आहे.
मुलुंडच्या एनईएस नॅशनल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असलेल्या क्रिशचं वर्गात लक्ष नसायचं. वर्गमित्रांमध्ये मिसळणं त्याला जमत नव्हतं. अभ्यास तर दूरची गोष्ट. सुरुवातीला शिक्षकांनी दुर्लक्ष केलं, पण तिसरीत गेल्यावरही सुधारणा होत नाही, म्हणून शिक्षकांनी पालकांकडे तक्रार करायला सुरुवात केली. शाळा क्रिशला काढून टाकण्याच्या प्रयत्नात होती. क्रिशची आई कोमल शाह यांनी चाईल्ड लर्निंग सेंटरचे संस्थापक डॉ. सुमित शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि क्रिशला नियमित समुपदेशन, थेरपी सुरु केली. पाचवी, सहावी, सातवी अशी तीन सलग वर्षं ऑक्युपेशनल थेरपिस्ट असलेल्या डॉ. सुमित शिंदे यांनी अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर आणि वर्तवणूक समस्यांच्या (बिहेव्हिअरल इश्यूज) संदर्भात क्रिशला समुपदेशन केलं. "क्रिश आठवीत येईपर्यंत त्याची वर्तवणूक समस्या दूर झाली. तो वर्गमित्रांमध्ये मिसळू लागला. त्याची शैक्षणिक कामगिरी सुधारली. ज्या विषयात उत्तीर्ण व्हायला त्याला अडचण यायची, त्या गणितासारख्या विषयात तो चांगले गुण मिळवू लागला", अशी माहिती क्रिशची आई कोमल शाह यांनी दिली. नुकत्याच लागलेल्या आयसीएससई दहावीच्या निकालात क्रिशला 90 टक्के गुण मिळाले, तेव्हा त्याच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
प्रतिक्रिया
डॉ. सुमित शिंदे (चाईल्ड लर्निंग सेंटरचे संस्थापक)
डॉ. सुमित शिंदे म्हणाले, वर्तवणूक समस्या तसंच अटेंशन डेफिसिट हायपर अॅक्टिव्हिटी डिसॉर्डरमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकले जातात. कोणत्याही प्रकारच्या डेव्हलपमेंटल इश्यूजमुळे किंवा लर्निंग डिसॅबिलिटीमुळे जर मुलांना अडचणी येत असतील, तर पालकांनी त्या वेळीच ओळखायला हव्यात. लहान वयातच अशा मुलांना जर योग्य समुपदेशन, मार्गदर्शन आणि उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आणि पालकांनीही जर मुलांकडे विशेष लक्ष दिलं, तर वर्तवणूक समस्याग्रस्त मुलंही इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात.
कोमल शाह (क्रिशची आई)
प्रत्येक आईला वाटत असतं की आपलं मूल हे सक्षम असावं आणि भविष्यात त्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत. क्रिश लहानपणी बोलताना अडखळायला लागला होता. शाळेत घातल्यानंतर त्याला अक्षरांची ओळख देखील होत नव्हती. त्यामुळे तो नेहमी घाबरलेला असायचा. ही गोष्ट आमच्या पण लक्षात आली होती. पण यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक डॉक्टर्सना दाखवण्यात आला, मात्र अपेक्षित असा बदल क्रिशमध्ये घडताना दिसत नव्हता. शेवटी डॉक्टर सुमित शिंदे यांनी क्रिशच्या या समस्येचे निराकरण केलं. त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पालना केले. क्रिशमध्ये हळूहळू बदल घडत गेला. आधीचा क्रिश आणि आता दहावीत मिळालेले गुण पाहिल्यानंतर क्रिशने ही जादूच केलेली आहे, असंच आम्हाला वाटतं. पालकांनी देखील आपल्या मुलांकडे बारीक लक्ष देऊन त्यांना येणाऱ्या समस्या ज्या त्या वेळी सोडवणं गरजेचा आहे असं मला वाटतं.