मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा अभियान राबवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली दहा लाख पत्र पाठवणार आहे. आता भाजपुमोच्या या अभियानाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसही उत्तर देणार आहे. "जय भवानी जय शिवाजी" लिहून 20 लाख पोस्टकार्ड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे.
शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर 'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड राज्यभरातून पाठवली जाणार आहेत. त्यालाच उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून 20 लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं.
'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पत्र शरद पवारांना पाठवणार, भाजपा युवा मोर्चाकडून राज्यभर अभियान
'जय भवानी जय शिवाजी' घोषणा दिल्याने नायडूंनी उदयनराजेंना रोखलं : राष्ट्रवादी युवक काँग्रेस
मेहबूब शेख म्हणाले की, "राज्यसभा खासदारांच्या शपथविधीच्या वेळी, भाजपच्याच एका खासदाराने 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा दिली. परंतु त्यावरी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना रोखलं. यावरुनच भाजपच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय भावना दिसून आली. महाराष्ट्राबद्दल भाजपच्या मनात किती द्वेष भरलेला आहे हे दिसतं. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा लिहिलेलं पोस्टकार्ड व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. भाजपने महाराष्ट्राचा द्वेष थांबवावा अन्यथा महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही."
सभापतींची उदयराजेंना समज
राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी 'जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. "तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या' असं व्यंकय्या नायडू म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार?
कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत, ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होते. कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटाता सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.
Sharad Pawar on Ram Mandir | काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,पवारांचा पंतप्रधानांना टोला