मुंबई : राजकारणासारख्या क्षेत्रात एखादी व्यक्ती तितकीच वर्ष टिकू शकते जितकी वर्ष त्या व्यक्तीला जनमानसात स्थान आहे. लोकशाहीत लोकांनी दिलेल्याच मतांच्या जोरावर कोणताही व्यक्ती विधी मंडळाच्या किंवा संसदेच्या सभागृहात पाऊल टाकू शकते. महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या राजकारणातही शरद पवार हे एकमेव नाव असं आहे ज्यांनी राज्यातील विधानसभा, विधानपरिषद या सभागृहात आणि संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहाचे सदस्य म्हणून काम केलं आहे.


शरद पवार यांनी नुकतीच राज्यसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. ही त्यांची कोणत्याही सभागृहाचे सदस्य होताना घेतलेली सोळावी शपथ होती. शरद पवार यांनी सगळ्यात आधी सुरुवात केली ती महाराष्ट्राचे विधानसभेतील सदस्य म्हणून. 1967 साली ते पहिल्यांदा बारामतीमधून आमदार म्हणून निवडून आले. ती त्यांची पहिली शपथ होती.


त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. वर्ष 1972, 1978, 1980 या तिन्ही वेळी बारामतीमधून ते आमदार म्हणून निवडून आले. 1978 रोजी शरद पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1984 मध्ये पहिल्यांदा ते बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले तेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली. ही पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.


1985 मध्ये पुन्हा शरद पवार विधानसभेवर आले. 1990 मध्ये आमदार म्हणून ही सातव्यांदा शपथ घेतली होती.


1991 मध्य पुन्हा एकदा शरद पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून काम केले.


मुंबईत झालेल्या दंगलीनंतर त्यांना दिल्लीतून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा मिळाली, तेव्हा 6 मार्च 1993 रोजी शरद पवार यांनी विधानपरिषदेवर सदस्य म्हणून शपथ घेतली.


1996 पासून शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे 1996 1998, 1999, 2004 चारवेळा बारामतीमधून लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली.


2009 मध्ये सुप्रिया सुळे बारामतीमधून पहिल्यांदा खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला आणि लेकीसाठी बारामती मतदारसंघ शरद पवार यांनी सोडला. पण माढामधून निवडणूक लढवली आणि सातव्यांदा लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली.


केंद्रीय कृषी मंत्री असतानाच आणि 2014 लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे 2014 ला पहिल्यांदा शरद पवार यांनी राज्यसभा सदस्य म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर काल दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. अशा प्रकारे शरद पवार यांनी सोळा वेळा विविध सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.


शिवाय देशातील ते पहिले नेते ठरले आहेत ज्यांनी चार ही सभागृहात सदस्य म्हणून काम केलं.