(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी का नाही? देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले...
पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळण्याबाबत विधानसभेनेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदारकीपासून वंचित राहिल्या आहेत. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचीही चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळण्याबाबत विधानसभेनेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. "पंकजा मुंडे मध्य प्रदेशचा प्रभार सांभळत असून आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो," असं फडणवीस म्हणाले.
पंकजा मुंडे कुठेच दिसत नाहीत, त्या नाराज आहेत का असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंकजाताई भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात, तिथलं आता इलेक्शन आहे, तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो, तुम्ही काळजी करु नका. भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे. आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत."
पंकजा मुंडे सध्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवारांची घोषणा झाली त्यात पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं. उलट भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजातून येणाऱ्या उमा खापरे यांना आमदारकीसाठी उमेदवारी दिली. याबद्दल केंद्रीय पातळीवरुन निर्णय झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अशा स्थितीत पंकजा मुंडेंच्या रुपाने दुसरे सत्ताकेंद्र महाराष्ट्रात निर्माण करणं टाळलं का? असाही प्रश्न विचारला जातो. गेल्या काही दिवसात भाजपमध्ये वनवासात गेलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस करुन त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांना आमदारकी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. या रांगेतील पंकजा मुंडे मात्र अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
संबंधित बातम्या :
- Pankaja Munde : यंदाची विधानपरिषदही नाही... पंकजा मुंडे यांना का डावलले?
- Vidhan Parishad : पंकजा मुंडेंना डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक, औरंगाबादमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड
- Vidhan Parishad Election : भाजपने मला उमेदवारी दिल्याचा पंकजा ताईंनाही आनंद होईल : उमा खापरे
- BJP Announce MLC Election Candidate : पंकजा मुंडे यांना पुन्हा डावललं; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा