उद्धव ठाकरेंच्या घणाघाती टीकेनंतर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले, ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते.
नाशिक: राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, अशी बोचरी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता माझे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मी, 'गेट वेल सून' एवढीच प्रतिक्रिया देईन, असे फडणवीस यांनी म्हटले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरुन सरकारवर होणारे आरोप फेटाळून लावले. राज्यात गेल्या काही काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, त्या निश्चितच गंभीर आहेत. पण या सर्व घटना वैयक्तिक वैमन्यसातून घडल्या आहेत. त्यामुळे याचा थेट कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य आहे. या गुन्हेगारी घटना आपापसातील हेवेदावे, भांडणांमुळे घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांना फडणवीसांचे प्रत्युत्तर
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावरील हल्लाप्रकरणात सत्ताधारी पक्षातील महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, विजय वडेट्टीवार यांना फार काही माहिती नसते. ते काहीही बोलत असतात. अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणाची चौकशी होईल. पण अलीकडच्या काळात जे गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांना सांभाळून बोलावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी वडेट्टीवारांना दिला.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस मृत्यू झालेल्या व्यक्तीची तुलना श्वानाशी करतात. मी त्यांच्यासाठी यापूर्वी वापरलेले 'कलंक', 'फडतूस' हे शब्द खूप सौम्य आहेत. त्यांची मानसिक तपासणी करावी का, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्यांची कालची प्रतिक्रिया पाहता गृहमंत्री मनोरुग्ण आहेत, असे म्हणावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी श्वान हा संस्कृत शब्द वापरला याचा अर्थ ते सुसंस्कृत आहेत, असा होत नाही. त्यांचे वक्तव्य हे निर्ढावलेपणाचे लक्षण आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
आणखी वाचा