मुंबई : राज्यात एक हजार गावं आदर्श करण्यासाठी उद्योजक-सेलिब्रिटी एकवटले आहेत. खेड्यांचा विकास करण्यासाठी 'व्हिलेज सोशल ट्रान्फॉर्मेशन मिशन'ची सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात उद्योग क्षेत्रातील नामवंत, सेलिब्रिटी तसंच तज्ज्ञांसमोर या योजनेचा आराखडा मांडला.
दुष्काळाच्या झळांनी मेटाकुटीस आलेल्या राज्यातील सुमारे एक हजार खेड्यांचे कायापालट करण्यासाठी सरकार नवीन योजना सुरु करणार आहे. यासाठी उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर फंडातून उपलब्ध होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या निधीचा वापर होणार आहे. या माध्यमातून या गावांमध्ये सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
बिर्ला ग्रुप 300 गावं आदर्श बनवणार आहे तर सामाजिक परिवर्तन अभियानासाठी रिलायन्स 4G डिजिटल प्लॅटफॉर्म देणार आहे. शिवाय या योजनेतून जलयुक्त शिवार, हागणदारी मुक्त गाव, शिक्षणात सुधारणा, नद्या, नाले, विहिरींचे पुनरूज्जीवन, 24 तास शुद्ध पाणी आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्यासह महानायक अमिताभ बच्चन, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा, महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा, हिंदुस्थान लिव्हरचे संजीव मेहता, बिर्ला ग्रुपच्या राजश्री बिर्ला, जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल, भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य, व्हिडीओकॉनचे प्रमुख राजकुमार धूत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, सध्या गावांचा विकास हा सरकार आणि सामाजिक संस्था, कार्पोरेट कंपन्या यांच्या स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून विकास करण्यात येत आहे. मात्र, गावांच्या शाश्वत विकासासाठी या सर्वांना एकत्रित करून विकास व्हावा, अशी या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या गावांचा विकास करत असताना त्यात ग्रामसभेलाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून गावांचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो, हे जलयुक्त शिवार कार्यक्रमाने दिसून आले आहे. त्यामुळे गावांना काय हवे आणि ते कशाप्रकारे करता येईल, याची योजना गावांनाच करायची आहे. एका निश्चित कालावधीत हा विकास करण्यात येणार असून त्याला क्लस्टरचे स्वरुप द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
येत्या 2 ऑक्टोबरपासून किमान 100 गावांमध्ये हे अभियान सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जल, जंगल, जमीन यांच्या माध्यमातून शाश्वत विकास करून गावांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून जलसंधारण, कृषी क्षेत्राच्या आणि कौशल्य विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
हे अभियान राबवण्यासाठी मेकॅनिझम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या गव्हर्निंग कौन्सिलची स्थापन करण्यात येणार आहे. एक हजार गावांपैकी 50 टक्के गावे ही सहभागी कार्पोरेट कंपन्या निवडणार असून उर्वरित 50 टक्के गावे ही मनुष्यबळ विकास निर्देशांकातील कमी निर्देशांक असलेल्या गावांतून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये 25 टक्के गावे ही आदिवासी असणार आहेत. या कामासाठी एकत्रित निधी उभारण्यात येणार असून त्याचे स्वरूप व विनियोगाची पद्धत तसेच या अभियानाचे स्वरूप, अंमलबजावणीची पद्धत आदी बाबी गव्हर्निंग कौन्सिल ठरविणार आहे.
यासंदर्भात झालेल्या बैठकीत श्री. रतन टाटा, आनंद महिंद्रा, राजश्री बिर्ला, सज्जन जिंदार, रोनी स्क्रूवाला, राजकुमार धूत यांच्यासह विविध मान्यवरांची या अभियानासाठी मोलाच्या सूचना केल्या. या अभियानात आर्थिक बरोबरच सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे जाहीर केले. श्रीमती बिर्ला यांनी बैठकीतच 300 गावांचा विकास आदित्य बिर्ला ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितलं.
तर अमिताभ बच्चन म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांमध्ये मी सहभागी झालो आहे. मात्र या उपक्रमाची संकल्पना अतिशय वेगळी आहे. या उपक्रमाच्या प्रचार आणि प्रसिद्धी करणे आवश्यक असून त्यासाठी माझ्या कौशल्याचा, आवाजाचा उपयोग करुन घेण्यासाठी माझी सर्व सहमती आहे.
सोशल ट्रान्फॉर्मेशन मिशनची वैशिष्ट्ये
अभियानाचा उद्देश
- राज्यातील अविकसीत 1 हजार गावांचा सर्वसमावेशक विकास करून त्यांचा कायापालट करणे
निधी व्यवस्थापन अंमलबजावणी पद्धत -
या अभियानाच्या निधी व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्निंग कौन्सिलची स्थापना करण्यात येणार आहे. तसंच विविध छोट्या छोट्या गटांच्या माध्यमातून अंमलबजावणीची पद्धत ठरवण्यात येणार आहे.
अभियानातील कामे
- गावांचा सामाजिक विकास करणे तसेच दुष्काळमुक्त करुन संपूर्ण जलसुरक्षा प्रदान करणार
- संपूर्ण जलसुरक्षेसाठी मॉडेल विकसित करणार त्यासाठी मनुष्यबळाचा विकास करणार
- गावातील लोकांना कौशल्यपूर्ण करणं
- ग्रामस्थांच्या सहभागातून जल, जंगल व जमिनीचा विकास करणार
- नैसर्गिक पद्धतीने जलपुनर्भरण, जलस्त्रोताचे बळकटीकरण
- घनकचरा व्यवस्थापन, हागणदारी मुक्त गाव उपक्रमास चालना देणार
- कृषी आधारित पूरक यंत्रणा निर्माण करणार