Devendra Fadnavis : रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजप नेत्यांनी हनुमान चालिसा समजून घ्यावी; मिटकरींचा टोला
Hanuman Chalisa Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसेचा आधी अर्थ समजून घ्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
Hanuman Chalisa Devendra Fadnavis : महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असताना हनुमान चालिसाच्या मुद्याने या संघर्षाला आणखी धार आणली असल्याचे चित्र आहे. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत हनुमान चालिसेच्या दोन ओळी सांगत राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मात्र, फडणवीस यांनी हनुमान चालिसाचा अर्थ समजून घ्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. फडणवीस यांनी हनुमान चालिसेचा चुकीचा अर्थ सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हनुमान चालिसाचा मुद्या राजकारणाच्या मैदानात केंद्रस्थानी आल्यानंतर आता त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडलेल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. हनुमान चालीसामधील दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला आधीपासून माहित आहे. ते फक्त त्याच दोन ओळींवर काम करत आहेत. काय आहेत या दोन ओळी तर, 'राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे'.. म्हणून फक्त 24 महिन्यात 53 मालमत्ता तयार झाली आणि यशवंत जाधव यांनी आपल्या मातोश्रीला 50 लाखांची घड्याळही दिली असेही फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस यांनी भाषणात उल्लेख केलेल्या दोन ओळींचा चुकीचा अर्थ सांगितला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. अमोल मिटकरी यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालीसा मधील चौपाई चा आधार घेत "पैसा" असा उल्लेख आला .रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजपाच्या ह्या भरीव नेत्यांनी खरा अर्थ अगोदर समजून घ्यावा असा टोलाही मिटकरींनी लगावला.
आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाजाचा कर्कश भोंगा ऐकला !त्या भोंग्यातुन हनुमान चालीसा मधील चौपाई चा आधार घेत "पैसा" असा उल्लेख आला .रात्रंदिवस पैसा पैसा करणाऱ्या भाजपाच्या ह्या भरीव नेत्यांनी खरा अर्थ अगोदर समजून घ्यावा "रामदुआरे तुम रखवारे ! होत न आज्ञा बिनु पईसारे ll याचा अर्थ pic.twitter.com/PIZhB5RTxW
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 15, 2022
दरम्यान, रविवारी पार पडलेल्या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा आहे. आम्हाला भाषणात नवे मुद्दे येतील अशी आशा होती परंतु शेवटपर्यंत लाफ्टर सभा होती. तेजस्वी ऐकायला मिळेल असा आम्हला काल वाटलं होतं, नवं काहीच ऐकायला मिळल नाही. कालची कौरवांची सभा झाली आज पांडवची सभा असल्याचेही त्यांनी म्हटले.
सकाळचा शपथविधी केला पण तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. जर तो शपथविधी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रीमंडळात एकही वाझे, मलिक देशमुख नसते. जर तशी वेळ आली असती तर आम्ही मंत्रिमंडळाला लाथ मारली असती, असेही फडणवीस यांनी म्हटले.