(Source: ECI/ABP News/ABP Majha)
COVID-19 Vaccination | 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मेगाप्लॅन, कसा असेल आराखडा?
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार आणि टास्क फोर्सकडून लसीकरण मोहिमेसाठी आता मेगाप्लॅन बनवला जात आहे. कसा असेल लसीकरणाच्या महामोहिमेचा आराखडा बघूया.
मुंबई : देशभरात 1 मे पासून कोरोनाविरोधातल्या लढाईचा एक नवा अंक सुरु होत आहे. सर्वांचं सरसकट लसीकरण करवं ही मागणी गेले अनेक दिवस जोर धरत होती. आता 18 वर्षांवरील नागरिकांच्या सरसकट लसीकरणाची घोषणा तर झाली आहे मात्र, तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का हा प्रश्न आहे.
महाराष्ट्र सरकार आणि टास्क फोर्सकडून लसीकरण मोहिमेसाठी आता मेगाप्लान बनवला जात आहे. लसीकरणाचं दरदिवसाचं टार्गेट काय असेल? कोणत्या कंपनीकडून लसीचा किती प्रमाणात पुरवठा व्हायला हवा याचं नियोजन पुढच्या काही दिवसांतच पूर्ण होईल. कसा असेल लसीकरणाच्या महामोहिमेचा आराखडा बघूया.
महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील नागरिकांची लोकसंख्या आहे साधारणत: साडेआठ कोटी
यापैकी अत्यावश्यक सेवेतील 1 कोटी लोकांचं लसीकरण पार पडलं आहे.
त्यामुळे महाराष्ट्रासमोर सुमारे साडसात कोटींच्या लसीकरणाचं नवं आव्हान आहे.
सध्या महाराष्ट्रात दररोज तीन ते साडेतीन लाख लोकांचं लसीकरण दररोज केलं जातं आहे.
- 1 मे पासून दररोज पाच लाख लोकांच्या लसीकरणाचं लक्ष्य ठेवलं जाईल.
- त्यामुळे पुढच्या पाच महिन्यांत 18 वर्षांवरील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
मात्र पुढच्या पाच महिन्यात कोरोनाविरोधातल्या लसीकरण मोहिमेचा कागदावरचा आराखडा प्रत्यक्षातही आणायचा असेल तर तेवढ्याच प्रमाणात लसीचं उत्पादन होणं गरजेचं आहे.
- सध्या महाराष्ट्रात सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्यांची कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस दिली जात आहे.
- या दोन्ही कंपन्यांकडून दर आठवड्याला 17 लाख डोस उपलब्ध होत आहेत.
- लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही लसी मिळून साधारणत: दर आठवड्याला 40 लाख लस पुरवठा होणं अपेक्षित आहे.
- या व्यतिरीक्त हाफकिन इन्स्टिट्यूटकडून होणारा लस पुरवठा आणि नव्याने परवानगी मिळालेल्या स्पुटनिक लसीचा पुरवठाही दिमतीला असेलच.
भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट या कंपन्यांना कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या लसीचे उत्पादन वाढवण्याचे टार्गेट दिलं जात आहे. तसंच, हाफकिन इन्स्टिट्यूटलाही वेगवान लस उत्पादनाचं लक्ष्य देण्यात आलं आहे.
कोणत्या लस उत्पादक कंपनीला किती डोस बनवण्याचे लक्ष्य?
- सध्या भारत बायोटेककडून वर्षाला अंदाजे 20 कोटीपर्यंतचे कोवॅक्सिन डोस तयार होत आहेत. हीच क्षमता वर्षाला 70 कोटीपर्यंत वाढवली जाईल.
- दर महिन्याला अंदाजे 6 कोटी कोवॅक्सिन लसीचे डोस देशभरासाठी भारत बायोटेककडून उपलब्ध होतील.
- नव्याने परवानगी मिळालेल्या महाराष्ट्राच्या हाफकिन इन्स्टिट्यूटची दर वर्षाला
अंदाजे 22 कोटी लसीचे डोस तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे दर महिन्याला हाफकिनकडून अंदाजे 2 कोटी लसीचे डोस मिळण्याची शक्यता आहे
- सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस उत्पादनाची क्षमता ही दर महिन्याला 6 ते 7 कोटी डोस एवढी आहे. ही क्षमता देखील भारत बायोटेकप्रमाणेच 3 ते 4 पट वाढवली जाईल.
- स्पुटनिक लसीच्या वापरला नुकतीच परवानगी मिळाल्याने या लसीचे नेमके किती डोस उपलब्ध होऊ शकतील याचाही अंदाज घेतला जात आहे.
18 वर्षांवरील लोकसंख्येचं सरसकट लसीकरण करणं हे कोरोनाविरोधातल्या लढाईचं एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. मात्र, या लसीकरण मोहिमेची प्रभावी आणि बिनचूक अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची आहे.