Not Specified
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला भ्रष्टाचाराचं गालबोट लागलं आहे. खुद्द जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी हे मान्य केलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचालेल्या प्रश्नाला तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तर दिलं.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबतचा मुळ प्रश्न होता. या कामात गैरव्यवहार झाल्याचे जलसंधारण विभागाने मान्य केले. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी केली असल्याची कबुली संबंधित मंत्र्यांनी दिली.
तसेच अशा प्रकारच्या 1300 कामांच्या विभागीय चौकशा सुरु असल्याचेही तानाजी सावंत यांनी सांगितले. याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणाची एसीबी चौकशी करायची किंवा नाही, याचा निर्णय घेऊ असंही सावंत यांनी सांगितले.
राज्यात जलयुक्त शिवारच्या हजारो कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे सरकार या संपूर्ण जलयुक्त अभियानाचे थर्ड पार्टी ऑडिट करणार का? सरकार भ्रष्टाचाराला, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उघड चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या उत्तराला मुंडे यांच्यासह हेमंत टकले, सतिश चव्हाण, भाई जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने मंत्र्यांना आपले विधान मागे घ्यावे लागले. तसेच सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.