मुंबई : 'चेस द व्हायरस', ट्रेसिंग-ट्रॅकींग-टेस्टींग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार अविरतपणे करण्यात येत असलेली कार्यवाही, मिशन झिरो, अव्याहतपणे सुरू असलेल्या गृहभेटी, बहुस्तरीय पद्धतीने सातत्याने करण्यात येत असलेली नागरिकांची पडताळणी, मुंबई पोलिसांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना; यासारख्या विविध बाबींचे नियोजन व व्यवस्थापन महापालिकेद्वारे सुव्यवस्थितपणे करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणजे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने चाळीशी पार केली होती. आता याच श्रृंखलेत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने आज 50 दिवसांचा टप्पा गाठत 'अर्धशतक' केले आहे.


रुग्ण दुपटीचा कालावधी म्हणजे नक्की काय?
'कोरोना कोविड19' या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्यास लागणारे 'दिवस' म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. सांख्यिकीय गणनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्या दुप्पट होण्यास सध्या 50 दिवसांचा कालावधी लागतोय. हा आकडा जेवढा अधिक किंवा मोठा असेल, तेवढी ती बाब आपल्यासाठी सकारात्मक असते. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच 7 दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांमध्ये सकारात्मक वाढ सातत्याने नोंदविली जात आहे. 22 मार्च 2020 रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ 3 दिवस होता. जो 15 एप्रिल 2020 रोजी 5 दिवस, दि. 12 मे 2020 रोजी 10 दिवस, 2 जून 2020 रोजी 20 दिवस, 16 जून रोजी 30 दिवस; 24 जून रोजी 41 दिवस नोंदविण्यात आला होता. तर नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार दि. 10 जुलै 2020 रोजी दिवस अखेरीस हा कालावधी तब्बल 50 दिवसांवर पोहचला आहे. ही बाब निश्चितपणे दिलासा देणारी आहे.

मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू


वरील माहितीनुसार रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे विभागस्तरीय विश्लेषण केले असता, हा कालावधी वांद्रे पूर्व-खार पूर्व-सांताक्रूज पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या 'एच पूर्व' विभागात 134 दिवस एवढा झाला आहे. तर या खालोखाल मशीद बंदर - सँडहर्स्ट रोड या रेल्वे स्थानकांनजिकच्या परिसराचा समावेश असलेल्या 'बी' विभागात 98 दिवस; कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या 'एल' विभागात 88 दिवस; दादर ट्राम टर्मिनस-वडाळा-माटुंगा-शीव इत्यादी परिसराचा समावेश असलेल्या 'एफ उत्तर' विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 79 दिवस एवढा झाला आहे. उर्वरित 20 विभागांपैकी 10 विभागांमध्ये हा कालावधी 50 दिवसांपेक्षा अधिक आहे. 24 जून 2020 रोजी बृहन्मुंबई महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा किमान कालावधी हा 20 दिवस होता; हा कालावधी आता किमान 27 दिवसांवर आला आहे.


रुग्णसंख्येतील दैनंदिन सरासरी टक्केवारीच्या वाढीत सातत्याने घट


‘कोविड कोरोना 19' या संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराचे विश्लेषण करताना रुग्ण दुपटीच्या कालावधीसोबतच आणखी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होण्याची सरासरी टक्केवारी. रुग्ण वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी जेवढी कमी तेवढी परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शक असते. रुग्ण संख्येत होणारी दैनंदिन वाढ ही जेवढी कमी, तेवढी ती बाब सकारात्मक असल्याचे मानले जाते. रुग्ण संख्येत होणारी वाढ ही आधल्या दिवशी असणारी रुग्णांची संख्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीची रुग्णसंख्या यातील फरकाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण असते. हे विश्लेषण व दर हा प्रती 100 रुग्णांमागील आकडेवारीवर आधारित असतो. महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्येत होणाऱ्या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत आहे. दि. 24 जून 2020 रोजी दिवस अखेरीस हा दर सरासरी 1.72 टक्के एवढा होता. ज्यात आता 'सकारात्मक घट' नोंदविण्यात आली असून हा दर आज सरासरी 1.39 टक्के एवढा झाला आहे. विभागस्तरीय आकडेवारीचा विचार केल्यास सर्वात कमी दर हा 'एच पूर्व' विभागात 0.5 टक्के, 'बी' विभागामध्ये 0.7 टक्के, 'एल' विभागात 0.8 टक्के आणि 'एफ उत्तर' विभागात 0.9 टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. उर्वरित 20 विभागांपैकी 11 विभागांमधील सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा हा 1.5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.


Coronavirus in Mumbai | मुंबईत महिन्याभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 टक्क्यांनी घसरला