मुंबई : कधी लॉकडाऊनवरून तर कधी बदल्यांवरून महाविकास आघाडीत खटके उडताना दिसतात. आता ईदसाठी काँग्रेसमधले काही मुस्लीम आमदार उत्सुक आहेत. पण शिवसेनेकडून सर्वच उत्सवांवर बंदी घातली, तर ईदला कशी परवानगी द्यायची असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे बकरी ईद साजरी होणार का? बकरी ईदवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये धुसफूस आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.


महाविकास आघाडीमध्ये आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत खटके उडाले. आता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलंच वाजत आहे. येत्या 1 ऑगस्टला बकरी ईद आहे. या ईद साजरी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे काही मुस्लीम नेते करत आहेत. पण अनेक वर्षांची परंपरा असलेली पंढरपूरची वारी, दहिहंडी उत्सव, गणेशोत्सवासारखे अनेक कार्यक्रम रद्द झालेले असताना बकरी ईदला परवानगी कशी द्यायची, असा सवाल उपस्थित केला गेलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जात, पंथ, धर्म बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरज असताना काँग्रेसच्या काही नेत्यांनी ईदचा हट्ट धरल्यानं शिवसेनेची अडचण झालीय. हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन चालणाऱ्या शिवसेनाला काँग्रेसच्या काही नेत्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, असं विरोधी पक्षाने आरोप केला.


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की, या सरकारमध्ये एक वाक्यात नाही. तसेच तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्याने हे वाद होतच राहणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात काँग्रेसच्या मंत्र्यांनी अशी मागणी करणे हे चुकीचं आहे. जात, धर्म बाजूला ठेवून या कोरोनाकडे पाहिलं पाहिजे. जिकडे सर्वच उत्सव साजरे होत नसताना काँग्रेसचे नेते अशी मागणी करून वोट बॅंकेचं राजकारण करत आहेत. त्यामुळे ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं दरेकर यांनी सांगितलं


ईद साजरी झाली तर...


महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्षाची विचारधारा वेगवेगळी असताना मिनिमम कॉमन प्रोग्रामच्या आधारावर तीनही पक्ष एकत्र आले आहेत. त्यात कधी अधिकारी बदल्यांवरून तर कधी लॉकडाऊनवरून महाविकास आघाडीत खटके उडाले. त्यात आता ईद सणाची भर पडलीय. गेल्या मार्च नंतर महाराष्ट्रात एकही सण उत्साहात साजरा करण्यात आला नाही. त्यात बकरी ईद साजरा करण्याचा काँग्रेसच्या काही नेत्यांनी हट्ट पकडलाय बकरी ईदसाठी महाराष्ट्राबाहेरून बकरे आणले जातात. हजारोंच्या बकऱ्यांची खरेदी विक्री होत असते. सण म्हटलं तर आर्थिक उलाढाली तर आल्याच पण या सगळ्या उत्साहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर जबाबदार कोण? या प्रश्नांचं उत्तर कोण देणार? आधीच महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाची संख्या वाढत चाललीय. त्यात ईद सारखा उत्सव साजरा झाला तर त्यात आणखी भर पडू शकते. त्यामुळे ईद साजरी झाली तर महाविकास आघाडीत वाद होणार एवढं नक्की आहे.


Bakri Eid 2020 | बकरी ईद साजरी करण्याच्या परवानगीसाठी काँग्रेस आग्रही