मुंबई : आज एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेनंही मुंबईतील धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. मात्र भाजपनं या धारावी पॅटर्नवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. .धारावीत गेल्या तीन दिवसात फक्त शंभर-सव्वाशे कोरोना चाचण्या झाल्या आहेत. कोरोनाच्या चाचण्याच होत नसतील तर रुग्ण कसे सापडणार? हा सवाल करत धारावीतील दिलासादायक चित्र कृत्रीम असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेची कौतुकाची थाप तर दुसरीकडे धारावी पॅटर्नवर विरोधकांची शंका. यामुळे धारावीतलं नेमकं चित्र काय याचा रिअॅलिटी चेक एबीपी माझाने केला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना मुंबईच्या धारावीतून एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सरकार आणि प्रशासनाला यश मिळालं. मात्र, याच वेळी महापालिका प्रशासन लोकांसमोर धारावीचं खोटं चित्र मांडत असल्याचा आरोप भाजपच्या किरीट सोमैय्यांनी केला आहे.
Dharavi | धारावीकरांनी करुन दाखवलं अन् जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल
अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत धारावीतील जवळपास 6.5 लाख लोकं वास्तव्य करतात. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या सरकार आणि प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली होती. दोन महिन्यापूर्वी धारावीत एका दिवसांत 100 हून अधिक रुग्ण सापडले होते. मात्र नंतर हळूहळू ही रुग्णसंख्या कमी होत गेली आणि तीन दिवसांपूर्वी धारावीत एका दिवसात केवळ एक रुग्ण आढळला होता.
जागतिक आरोग्य संघटनेनं एका ट्वीटच्या माध्यमातून जगभरात कोरोनाविरोधात राबवण्यात येत असलेल्या आक्रमक उपाययोजनांचं कौतुक केलं. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी म्हटलं की, कोरोना महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील धारावी जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याचीच काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगिकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
विरोधकांच्या आरोपावर महापालिकेनंही आपली बाजू स्पष्ट केली आहे. धारावीत पुरेशा टेस्ट होत आहेत असं सांगत धारावी पॅटर्नचं महापालिकेने समर्थन केलं आहे. शुक्रवारी धारावीत अवघे 12 नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या धारावी येथे 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1952 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
Coronavirus in Mumbai | मुंबईत महिन्याभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 टक्क्यांनी घसरला