मुंबई : मुंबईत कोरोनाबाबत सर्वात चांगली कामगिरी असणाऱ्या वांद्रे पूर्व-खार येथील एच ईस्ट वॉर्डच्या ऑफिसरचा मृत्यू झाला आहे. एच ईस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार ( वय 57 वर्ष) यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशोक खैरनार यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांच्यावर वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरपीनंही त्यांच्यावर उपचार झाले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना काल (शुक्रवार) फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे. थोड्याच वेळात शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचा मृतदेह नेण्यात येईल. दुर्देव म्हणजे मुंबईत सर्वात कमी ग्रोथ रेट त्यांच्या एच ईस्ट वॉर्डाचा होता. रुग्णसंख्या वाढीचा दर रोखण्यात तसेच डबलिंग रेट वाढवण्यात त्यांना यश आलं होतं. मात्र कोरोनाने त्यांना गाठलं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे.
अशोक खैरनार यांच्या अचानक मृत्युमुळे सगळेच अधिकारी, कर्मचारी हादरले आहेत. कोरोना विरोधातील लढ्यात अशोक खैरनारांनी बजावलेली कामगिरी वाखाणण्याजोगी होती. वांद्रे पूर्व-खार हा भाग सुरुवातीला मुंबईतील मोठा हॉटस्पॉट होता. त्यानंतर दीड महिन्यांतच सर्वात कमी रुग्णवाढ असलेला भाग म्हणून हा वॉर्ड नावाजला गेला. या ठिकाणचा रुग्णसंख्या वाढीचा दर रोखण्यात तसेच डबलिंग रेट वाढवण्यात त्यांना यश आलं होतं.
मातोश्री या मुख्ययमंत्र्यांच्या निवासस्थानाचा समावेश असलेल्या वॉर्डचे ऑफिसर
अशोक खैरनार यांच्याकडे मुख्यंमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाचा समावेश असलेल्या वॉर्डची जबाबदारी होती. जेव्हा मातोश्रीजवळच्या चहा टपरीवाला कोरोना पॉझिटिव्ह झाला तेव्हाच कोरोनाने मातोश्री परिसर, साहित्य सहवास या भागात प्रवेश केला. वांद्रे पूर्वमध्ये कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले होते. मुख्ययमंत्र्यांच्या ताफ्यातील काही सुरक्षारक्षक आणि पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली, त्यावेळी वांद्रे पूर्व हा मुंबईतला रेड झोन ठरला. पण वांद्रे पूर्व आणि खारमधील इमारती आणि रहिवासी वस्त्यांसोबतच या विभागातील दाटीवाटीच्या वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अशोक खैरनार यांना मोठं यश मिळालं होतं.
अशोक खैरनार यांनी कोरोनाचं आव्हान वॉर्ड ऑफिसर म्हणून कसं पेललं होतं?
वांद्रे पूर्व आणि खारचा समावेश असलेल्या एच इस्ट वॉर्डची लोकसंख्या 6 लाखांपेक्षा जास्त आहे. या विभागातला 78 टक्के भाग झोपडपट्टीने व्यापला आहे. बेहरमपाडा, गोळीबार, शास्त्रीनगर, भारतनगर, वाकोला या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती आहे. या भागात कोरोना नियंत्रणात आणणं सर्वात मोठं आव्हान होतं. एच पूर्व विभागातील रुग्णसंख्येने 3700 चा आकडा पार केला. मात्र यांपैकी जवळपास 2800 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. एच पूर्वचा दररोजचा रुग्णवाढीचा दर हा मुंबईत सर्वात कमी म्हणजे 0.5 टक्के इतकाच आहे. तर रुग्णसंख्या दुपटीचा दर हा शंभर दिवसांपेक्षा जास्त आहे. सध्या हा कालावधी 134 दिवसांवर पोहोचला आहे.
अशोक खैरनार यांचा अल्पपरिचय
धुळे महानगरपालिका हद्दीतील मोहाडीचे मूळ रहिवासी असलेले अशोक खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि 'आय. आय. टी. पवई' या सुविख्यात संस्थेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. खैरनार हे फेब्रुवारी 1988 पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी 2018 पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून अशोक खैरनार यांना तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते 'जानेवारी 2019' साठी 'ऑफिसर ऑफ द मंथ' या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते.
Coronavirus in Mumbai | मुंबईत महिन्याभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 टक्क्यांनी घसरला