Coronavirus : शेकडो कोरोना रुग्णांना वाचविणाऱ्या डॉक्टर पितापुत्रांना मात्र कोरोनानेच हिरावले, कल्याणमध्ये हळहळ
मागील वर्षभरात शेकडो कोरोना रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टर पितापुत्राचा कोरोनानेच मृत्यू झाल्याने कल्याणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कल्याण : डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत आपल्या क्लिनिकमधून सर्वसामान्य नागरिकांची सेवा केलेल्या आणि मागील वर्षभरात शेकडो कोरोना रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टर पितापुत्राचा कोरोनानेच मृत्यू झाल्याने कल्याणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कल्याणमधील डॉक्टर नागेंद्र मिश्रा आणि त्यांचा मुलगा डॉक्टर सुरज मिश्रा या पिता पुत्राचा काही तासाच्या फरकाने वेगवेगळ्या कोरोना रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने परिसर हळहळला आहे. सुरज याचे नोव्हेंबर महिन्यात लग्न झाले होते तर नागेंद्र यांचा काल वाढदिवस होता, त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. नागेंद्र यांनी पहिली लस घेतली होती, दुसरा डोस घेणार होते. मात्र त्या आधीच त्यांना कोरोनाने गाठले. या डॉक्टरांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाने बाधित असून व्हेंटिलेटर मिळत नसल्याने त्यांना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
टिटवाळा खडवली परिसरात मागील 22 वर्षापासून डॉक्टर नागेंद्र मिश्रा क्लिनिक चालवत असून कोरोना काळात त्यांनी अनेक कोरोना रुग्णाना जीवदान दिले. तर त्यांचा धाकटा मुलगा सुरज याचे भिवंडी बापगावमध्ये क्लिनिक होते. गोरगरीब रुग्णांची सेवा करता यावी यासाठी या दोघांनी आपले क्लिनिक ग्रामीण भागात सुरू केले होते. या दोघांचा सामाजिक कार्यात देखील सहभाग असायचा. कोरोना काळात गरजु रुग्णांवर मोफत उपचार, लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत, गरीबांना लग्नात मदत असे अनेक मदतकार्य ते करत होते. हे करत असताना त्यांना कोरोनाने गाठले.
6 दिवसापूर्वी अचानक ताप येऊ लागल्याने केलेल्या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. मात्र शेकडो रुग्णांना जीवदान देणाऱ्या या डॉक्टरांना कल्याण डोंबिवलीमध्ये वेळेवर कुठेही बेड मिळाला नाही. नागेंद्र यांना ठाणे येथील वेदांत रुग्णालय तर सुरज यांना मुंबई गोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागेंद्र यांच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आल्याने त्यांना वसई विरार येथील रुग्णलयात दखल करण्यात आले. तर त्याचा मोठा मुलगा विनय व त्यांची पत्नी होम क्वारंटाईन आहेत. डॉक्टर सुरज याचे बुधवारी 15 एप्रिल रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले तर वडील नागेंद्र यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. शेकडो रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना मात्र कोरोनाने हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.