सेलिब्रेटी लसीकरण प्रकरण; 21 जणांना दिले बनावट ओळखपत्र
सेलिब्रेटी लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत यातील 15 जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचे म्हटले जात आहे.
ठाणे : ठाण्यातील सेलिब्रिटी लसीकरण प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्याप्रमाणे तब्बल 21 जणांना येथील ठेकेदाराने बनावट ओळखपत्र दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या सेलिब्रेटी लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत यातील 15 जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचे म्हटले जात आहे.
ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या कोविड केद्रात अभिनेत्री मीरा चोप्राला झालेल्या बेकायदेशीर लसीकरणानंतर महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यानुसार या समितीने केलेल्या तपासावरून आत्तापर्यंत २१ जणांना अशाप्रकारे बनावट ओळखपत्र दिल्याचे समोर आले आहे.
ओळखपत्र मिळालेल्या १५ जणांनी बेकायदेशीरपणे लस घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असतानाही पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात मीरा चोप्रा या अभिनेत्रीला फ्रंटलाईन वर्कर असल्याचे दाखवून लस देण्यात आली होती. ओम साई आरोग्य सेवा या संस्थेनेच हे बनावट ओळखपत्र तयार करून अशाप्रकारे लस दिल्याची माहिती समोर आल्यानंतर उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती.चौकशीअंती या समितीने सादर केलेल्या अहवालात १९ जणांना सुपरवायझर तर २ जणांना अटेंडंट असल्याचे बनावट ओळखपत्र देण्यात आल्याचे समोर आले आहे.
राज्यात गुरुवारी 25,617 डिस्चार्ज तर 15,229 नवीन कोरोनाबाधित
राज्यात गुरुवारी 15,229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 25,617 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये 307 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 204974 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 54,86,206 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.73% टक्के एवढे झाले आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणासोबतच राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंही गती घेतली आहे. पण, असं असलं तरीही लसींच्या तुटवड्याची समस्या मात्र जैसे थे आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत बनावट ओळपत्र बनवत लस घेणाऱ्यांना आळा घालणं अतीव गरजेचं आहे.