मुंबई : कोरोना व्हायरस चीनमध्ये फोफावत चालल्यामुळे चीनमधून भारतात येणाऱ्या वस्तूंचा भारतीय बाजारपेठेमध्ये तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे. देशातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत म्हणजेच मुंबईच्या बाजारपेठेत चायना वस्तूंचं शॉर्टेज होऊ लागल्याने या वस्तू आता महाग विकल्या जाऊ लागल्या आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरणाऱ्या बहुतांशी वस्तूंमध्ये चायना वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असतात. ज्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध असतात त्यातील बहुतांश चायनाच्या असतात. मात्र चीनमध्ये कोरोना व्हायरस आल्यामुळे चीनमधून जगभरातील व्यापारी पेठांमध्ये येणाऱ्या वस्तूंचा आता तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबईतील बाजारपेठांमध्ये चायनाच्या वस्तूंनी जणू कब्जा केला असल्याचे चित्र आहे. घरगुती वस्तू , शोभेच्या वस्तू , दररोज वापरातल्या वस्तू, चपलापासून मोबाईलपर्यंत अशा सर्वच वस्तू चीनमधून मुंबईतील व्यापारपेठांमध्ये विक्रीसाठी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे बहुतांश लोक या वस्तू खरेदी करतात.



स्वस्त आणि मस्त अशा स्वरूपात या वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहकांना या वस्तू आकर्षित करत असतात. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून चीनमध्ये कोरोनो व्हायरस आल्यामुळे चीनमधून जगभरातील व्यापारपेठांमध्ये पाठवला जाणारा माल जैसे थे स्थितीमध्ये पडून आहे. चीनची बाजारपेठ ठप्प झाल्यामुळे याचा परिणाम जगभरातल्या व्यापारी पेठांवर झालेला आहे. मुंबईतील बाजारपेठांमध्ये चिनी माल मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. मात्र कोरोनो व्हायरसचा इफेक्ट मुंबईतील बाजारपेठांवर देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

मुंबईतील बाजारपेठांमध्ये मोबाईल सह मोबाईल ॲक्सेसरीज, घर सजविण्यासाठी बेडशीट - पिलो , पिलो कवर, रंगीबिरंगी फुले, फुलदाणी , झाडे, शोभेच्या वस्तू, शोकेशमधील आकर्षक वस्तू या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. या वस्तू स्वस्त मिळत असल्यामुळे मुंबईतील होलसेल मार्केटमधून मोठ्या प्रमाणात या वस्तू महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विक्रीसाठी जात असतात. मात्र मुंबईतील बाजारपेठेमध्ये या मालाची आवक थांबल्यामुळे हा बाजार थंडावलेला आहे.


कोरोनो व्हायरस चीनमध्ये आल्यामुळे आता चीनमधून इतर देशांमध्ये पाठवला जाणारा माल सध्या पाठवण्यात येत नाही. त्यामुळे जगभरातील सर्वच मार्केटमध्ये चिनी मालाचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे. याचा फायदा घेत व्यापारी या वस्तू दीडपट किमतीने विक्रीसाठी ठेवत असल्याचे ही पाहायला मिळत आहे. पुढील किमान तीन महिने तरी चिनी वस्तू बाजारात चढ्या भावाने विकल्या जाणार आहेत. कारण येत्या जून महिन्यापर्यंत चीनमधून मालाची आवक होईल असं व्यापाऱ्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या जवळ असलेला माल मूळ किमतीपेक्षा अधिक चढ्या भावाने विकला जात आहे. त्यामुळे बाजारपेठांकडेही ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.