मुंबई : 'कोरोना' विषाणू आता भारतात आलाय हे निश्चित झालंय. सध्या देशात 28 जणांना कोरोना झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. यातील काही परदेशी नागरीक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारं आपापल्यापरिनं 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करतायत. विविध जबाबदार माध्यमांमधून लोकाना 'कोरोना' होण्यापासून कोणते प्रतिबंधक उपाय योजले जावेत याबद्दल मार्गदर्शन केलं जातंय. एकीकडे हे चित्रं आहे तर दुसरीकडे बोलभांडांनाही ऊत आलाय. आसाममध्ये भाजपच्या एक आमदार सुमन हरिप्रिया यांनी गोमूत्र आणि शेणाच्या वापरानं 'कोरोना' दूर ठेवला जाऊ शकतो असा दावा केलाय. भाजपचेच उ. प्रदेशमधील लोनी येथील आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी तर कोरोनो त्यांच्या मतदारसंघात येऊ शकत नाही कारण तिथे मोठ्या संख्येनं गोशाळा आहेत, असं म्हटलंय. याच्यावर कहर म्हणजे हिंदू महासभेचे नेते चक्रपाणी महाराज यांनी तर 'गोमूत्र पार्टी'चं आयोजन केलंय. आपल्याला हे हास्यास्पद वाटेल मात्र समाजतल्या एका मोठ्या वर्गाला या गोष्टींचं अप्रुप वाटतं. अशा गोष्टींना भुलून लोक वाट्टेल तसे उपचार करतात आणि रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होते.
याच विषयावर आयोजित 'माझा विशेष'मध्ये विविध विषयाच्या तज्ज्ञांनी गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले. राज्याच्या आरोग्यविभागातील वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, आरोग्य विभागाकडून रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी विविध उपाय योजले जात असून डॉक्टरांशीही संवाद साधला जातोय. याबद्दलच्या मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय, केंद्राच्या आरोग्य विभागाशीही समन्वय साधला जातोय. कार्यक्रमात थेट चीनहून सहभागी झालेली अपूर्वा सुभेदार हिनं चीनमधील परिस्थिती वर्णन करताना सांगितलं की, चीनमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं काटेकोर काळजी घेतली जातेय. परदेशातून आलेल्या लोकांची राहण्याची ठिकाणं, त्यांच्या प्रवासाचा मार्ग याचीही नोंद ठेवली जाते. व्यक्तिगत स्वच्छतेला प्रचंड महत्व दिलं जात असून अगदी लिफ्टमधील बटणांचा वापर केल्यावरही सॅनिटायझरनं हात स्वच्छ केले जातायत. सामान घेणे, पैसे देणे अशा साध्या कृतींमध्येही थेट संपर्क टाळण्यावर भर दिला जातोय. चीनच्या अशाच कठोर उपाययोजनांमुळे कोरोनाग्रस्त वुहान किंवा ह्युबेई प्रांताबाहेर विषाणूचा प्रभाव बिजींग किंवा शांघाई अशा शहरात होऊ शकलेला नाही, याकडेही अपूर्वानं लक्ष वेधलं. चीन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अविनाश गोडबोले म्हणाले की, गोमुत्राद्वारे कोरोनावर उपचार अशा प्रकारांमुळे जगभर भारताचं हसं होऊ शकतं. कोरोनाचा प्रादुर्भाव ही आरोग्य आणिबाणी तर आहेच, मात्र अर्थव्यवस्थेवर परिणाम घडवायची उपद्रव क्षमताही या समस्येच्या ठायी आहे.
फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. समीर अर्बट, संसर्गजन्यरोग तज्ज्ञ डॉ. भरत पुरंदरे यांनी 'कोरोना'च्या स्वरूपाला विषद करतानाच 'कोरोना'वर उपचार नसल्यानं निसर्गत: मिळणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीचा इथे उपयोग नाही हे स्पष्ट केलं. गोमुत्राने उपचार अशा वावड्यांमुळे संसर्ग झाल्यास लोक चुकीचा उपचार करवून घेऊन अधिकच कठीण परिस्थिती निर्माण करू शकतात, असंही त्यांनी सांगितलं. डॉ. स्वप्ना पलांदे यांनी वातावरणीय बदल, पाणी पिण्याचं महत्व आणि कोरोनाशी लढण्याची रणनिती स्पष्ट केली. मास्क वापरण्याबाबत त्यांचे आणि डॉ. आवटे यांचे काहीसे मतभेद समोर आले तरी मास्कमुळे विषाणूला अटकाव केला जाऊ शकतो, असं डॉ. पलांदे यांनी नमूद केलं. डॉक्टर आणि सर्वसामान्य यांच्याशी संवाद साधण्यासाठी राज्य सरकारची हेल्पलाईन असावी, असाही मुद्दा या चर्चेत पुढे आला.
डॉ. परिक्षीत शेवडे यांनी गोमुत्र उपचार यावर कोणतीही शास्त्रोक्त माहिती नसताना चुकीचे दावे करणाऱ्यांवर टीका केली. मात्र, त्याचवेळी आयुर्वेदाचं काहीच नको अशा प्रवृत्तींच्या चुकाही त्यांनी दाखवून दिल्या. 'कोरोना'ला उपाय आधुनिक वैद्यकशास्त्रालाही सापडला नाही, असं म्हणतानाच डॉ. शेवडे यांनी रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी आयुर्वेदाचा नक्कीच उपयोग होऊ शकतो याकडे लक्ष वेधलं.