मुंबई : योग्य पुस्तक योग्य वेळी प्रकाशित होतंय याचा मला आनंद आहे. सामान्य माणसाला अर्थसंकल्प समजावं यासाठी पुस्तक उपयोगी आहेच, पण अर्थसंकल्पाची केवळ भाषा सोपी करून चालणार नाही, तर अर्थमंत्र्यांची दिशा आणि हेतू सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं असतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता, तुम्ही राजकारण सोडून साहित्यिक होण्याचा विचार करावा, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

हे पुस्तक वाचून ते उत्तम साहित्यिक होऊ शकतात याची खात्री पटली आहे. यावेळी राम नाईक यांच्याकडे पाहात तुम्हीही या कार्यक्रमाला हजर आहात. तुम्ही जरा वर दिल्लीला सांगितलं की हे साहित्यिक आहेत, यांना बरंच ज्ञान आहे आणि फडणवीसांच्या ज्ञानाचा आपण दिल्लीत वापर करून घेऊ. तर महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाची त्याला एकमताने मान्यता राहील. असं झाल्यास सुधीर मुनगंटीवार यांनाच त्याचा सर्वाधिक आनंद होईल, असा चिमटा अजित पवार यांनी काढताच सभागृहात एकच हशा पिकला.

केवळ मला समजावं म्हणून फडणवीसांनी हे पुस्तक लिहिलं, पुस्तक प्रकाशनावेळी मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

यावेळी पवार यांनी यंदाच्या पहिल्या टर्ममधील सर्व सदस्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, अर्थमंत्री असताना मी पहिला अर्थसंकल्प सभागृहात मांडला होता. त्यावेळी सगळे विरोधी आमदार सभागृहात गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता. मात्र, एकच सदस्य कानाला एअर फोन लावून अर्थसंकल्प ऐकत होता. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. अशी आठवण सांगतानाच त्या दिवशी सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांचा गोंधळ अधिकच सुरू होता. फडणवीसांनी त्यांना थोडं समजावून सांगावं असं मला वाटत होतं. त्यावेळी महाजन आणि मुनगंटीवारांचा गोंधळ सुरूच होता. कानाला एअरफोन लावून अर्थसंकल्प ऐकणारा हा आमदार पुढे मुख्यमंत्री होईल आणि त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल, असं या दोघांनाही वाटलं नसेल, असा टोला त्यांनी हाणताच एकच हशा पिकला.



 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस लिखित 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विधाससभा अध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमानिमित्त सत्ताधारी-विरोधक आज एकाच मंचावर आले. त्यामुळे या दिग्गजांनी एकमेकांना टोले आणि टोमणे मारले नसते तरच नवल. विशेष म्हणजे राज्यात रंगलेल्या सत्ता नाट्यानंतर देवेंद्र फडणवीसांची फिरकी घेण्याची एकही संधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोडली नाही.