मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केले.


यावेळी या आपत्कालीन चर्चेत सहभाग घेताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोरोनाच्या रुग्णांची सर्व सामान्य तपासणी पहिल्या दिवशीच करून सुद्धा निदान होऊ शकते. तसेच या रुग्णाची माहिती घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. व्यक्तिगत स्वच्छता व रुग्णांशी थेट संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणणे हेच आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक आहे. नागरिकांना या आजाराबद्दल आवश्यक माहिती हवी असलेल्या http://www.cdc.gov/coronavirus या वेबसाईट वर मिळू शकते असेही सांगितले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्य शासनाने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत मुंबईत आलेल्या 551 आंतरराष्ट्रीय विमानातील 65 हजार 121 प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून 401 प्रवाशी आले असून आतापर्यंत 152 प्रवाशांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी 149 लोकांचे नमूने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 143 जणांना घरी सोडले आहे. सध्या सहा जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरिक्षणाखाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.

महाराष्ट्रातील विमानतळ व सर्व बंदरांवर तपासणी

महाराष्ट्रातील सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची देखील तपासणी केली होत आहे. आतापर्यंत 30 जहाजांमधील 676 प्रवाशांची तपासणी केली त्यात संशयित रुग्ण आढळून आला नाही. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार चीनसह 12 देशांमधून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आता मात्र सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात असून प्रत्येकाला 'स्वघोषणापत्र' देणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे.

कोरोनाची जागतिकस्तरावरील सद्यस्थिती स्पष्ट करताना आरोग्यमंत्री म्हणाले, चीनमध्ये 80 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून 2 हजार 915 जणांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये 280 जणांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून इराणमध्ये 1000 जणांना बाधा होवून 66 जणांचा मृत्यू झाला आहे तर इटलीमध्ये 2000 जण बाधित असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये बाधितांची संख्या 4300 असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत पाच ठिकाणी विलगीकरणाची सोय

मुंबई येथे कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

खोकताना, शिंकताना सामाजिक शिष्टाचार पाळावा

कोरोनाच्या सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध

केंद्र शासनाच्यावतीने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून 6 मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होणार आहे. राज्यातील काही डॉक्टर त्यात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील अन्य डॉक्टरांना प्रशिक्षीत केले जाईल. राज्यात पर्सनल प्रोटेक्शन कीट, एन-95 मास्क,, ट्रीपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध असून त्याची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

जगात कोरोनाचा उद्रेक! 3200 लोकांचा मृत्यू

 सोशल मीडियातून चुकीचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग, दृकश्राव्य माध्यमांवर जाहिराती, चित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण आदी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सोशल मीडियातून अधिकृत संदेश पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात सध्या सोशल मीडीयातून जो चुकीचा प्रचार केला जात आहे. तो रोखण्याकरिता सायबर क्राईमच्या अतिरिक्त महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विधिमंडळ सदस्यांसाठी प्रबोधनपर चर्चासत्र

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठी यासंदर्भात प्रबोधनपर चर्चासत्र अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. स्वच्छ धुतलेला रुमाल वापरुन प्रतिबंध होवू शकतो असे सांगतानाच हे मास्क रुग्णालयातील कर्मचारी, बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी वापरावे. अशा मास्कची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ईशाराही त्यांनी दिला. सध्या इराणमध्ये 1200 विद्यार्थी आणि नागरिक अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

CoronaVirus Outbreak | कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अशी घ्याल काळजी