मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात चुकीचे असं मी काहीच केलेलं नाही, केवळ गरजू लोकांना मदत करण्याच्या हेतूनेच आपल्या संस्थेमार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचं गरजवंतांना वाटप केले. असा दावा अभिनेता सोनू सूद याने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. कोविड 19 संदर्भात विविध समस्यांप्रकरणी हायकोर्टात दाखल विविध याचिकांवरील सध्या एकत्रित सुनावणी सुरू आहे. ज्यात खाजगीत लोकांना कोरोनावरील औषध वाटणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. यात वांद्रे पूर्व येथील आमदार जिशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूद यांची नावं पुढे आहेत.


कोविड 19 वर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना सेलिब्रिटींना परस्पर हे इंजेक्शन मिळाल्यानं हायकोर्टानं याची गंभीर दखल घेतली होती. तसेच सेलिब्रिटींना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळालेच कसं? असा सवाल विचारत हायकोर्टाने या प्रकरणी चौकशी करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले होते. यासंदर्भातील याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सोनू सूद यानं अॅड मिलन देसाई यांच्यामार्फत मध्यस्थी याचिका दाखल केली आहे. ज्यात त्यानं आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, काही लोक निव्वळ आपली बदनामी करून आपण करत असलेल्या जनकल्याणाच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत असा दावा सोनू सूदच्या वतीने करण्यात आला.


कोरोनाच्या काळात आपण अखंडपणे लोकहिताचं काम केलं. पहिल्या लाटेत घरी परतणाऱ्या मजुरांना मदत केली. तर दुसऱ्या लाटेत लोकांना आवश्यक असलेली औषधे उपलब्ध होत नव्हती ती आपण केवळ दुआ म्हणून त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम केल. यात औषध उत्पादक कंपनीकडून गरजवंतांना ती आपण केवळ मिळवून दिली, असा दावा सूदच्या वकिलांनी केला आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.


इतर महत्त्वाच्या बातम्य