पुणे/मुंबई : पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नबाबत आज (मंगळवार 29 जून) उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला  मंत्री, सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते तर काहीजण व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीला आपल्याला आमंत्रण नसल्याचा आरोप करत पुणे महापालिकेच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तर यावर राष्ट्रवादीचे आमदारांनी महापौरांना बैठकीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं आहे.



मला या बैठकीचे आमंत्रण आज सकाळी व्हॉट्सअपवर देण्यात आले : महापौर
मला या बैठकीचे आमंत्रण आज सकाळी व्हॉट्सअपवर देण्यात आले. मला जर आधी कळाले असते तर मी या बैठकीला उपस्थित राहिलो असतो. मला या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचा आज सकाळी फोन आला. पण, त्यावेळेस मी कौटुंबिक कामासाठी पुण्याच्या बाहेर पडलो होतो. या बैठकीसाठीचे जे आधीचे म्हणजे 24 आणि पंचवीस तारखेचे पत्र आहे त्यामध्ये माझे नाव नाही. पुण्याच्या हिताचे निर्णय होत असतील तर आनंदच आहे. मात्र, यात राजकारण होतयं हे स्पष्ट दिसतय, असा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलाय.






निमंत्रण नसणे म्हणजे पुणेकरांना डावलल्यासारखं : महापौर मुरलीधर मोहोळ
महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही. उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत. गेल्या चार वर्षांत पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे. मात्र, आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच, अशी टीका ट्विटच्या माध्यमातून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलीय.


महापौरांना रीतसर निमंत्रण दिलं होतं : आमदार चेतन तुपे
उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून महापौरांना रीतसर निमंत्रण दिलं होतं. आमचे सहकारी आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन केला होता. मात्र, महापौरांच्या घरी दुःखद घटना घडल्याने व्हिसीमध्ये सुद्धा उपस्थित राहू शकत नाही, असे त्यांनी आमच्या आमदारांना सांगितलं. आता हे बोलून सुद्धा त्यांनी हे ट्विट काय केलं याबाबत मला काही सांगता येणार नाही. परंतु, त्यांना उपमुख्यमंत्री कार्यालयातूनही निरोप गेला होता, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी दिली.


उपमुख्यमंत्री यांनासुद्धा आम्ही याबाबत बैठकीदरम्यान माहिती दिली. मीटिंग अडीच वाजता होती, त्याआधीच आमदारांनी महापौरांना फोन केला होता आणि त्यात त्यांनी हे कारण सांगितलं. वेळेत महापौरांना निमंत्रण गेलं होतं. सर्व अधिकारी, आयुक्त, आमदार सगळे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत म्हाडा कॉलनीच्या पुनर्वसनाचा प्रश्न होता तो मार्गी लावण्यासाठी निर्णय घेण्यात आला. आंबील ओढा आणि इतर वसाहतीबाबत कोर्टाने निर्णय दिले होते, यामध्ये ओढ्याच्या भिंतीबाबत काय करावे? संदर्भात निर्णय झाल्याचे आमदार तुपे यांनी सांगितले.


दिपाली धुमाळ विरोधी पक्षनेत्या पुणे महापालिका
महापौर यांच्या घरी त्यांच्या काकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना निमंत्रण होतं मात्र ते या कारणामुळे येऊ शकले नाहीत. पुण्याच्या विकासाबाबत प्रश्न या बैठकीत मांडले गेले. महापौरांनी याबाबत काही गैरसमज करून घेऊ नये असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली.