मुंबई: अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या, लॉकडाऊनच्या संकटात गरिबांसाठी, मजुरांसाठी धावून गेला, त्याने मजुरांना घरी पोहोचवण्यापासून ते अनेकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करेपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले.  मात्र केवळ गरिबांनाच नाही तर बॉलीवुड कलाकार आणि भारतीय खेळाडूंच्या मदतीसाठी देखील तो मागे राहिला नाही. भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि बॉलिवुड अभिनेत्री नेहा धुपिया यांना त्याने मदत केली. नेहा धुपिया हिने रेमडेसिवीर मिळत नसल्याने सोनू सूदकडे मदत मागितली होती आणि सुरेश रैना याने ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने त्यासाठी मागणी केली होती. 


देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. अशा परिस्थितीत सोनू सूद सतत लोकांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतोय. ट्विटरवर लोक सोनू सूदला मदतीसाठी आवाहन करतात. केवळ सामान्य माणसंच नाही तर आता बर्‍याच प्रसिद्ध व्यक्तींची नावंही या यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना यानीही ट्विटरवर ऑक्सिजन सिलेंडरसाठी मदतीची विनंती केली होती.



सुरेश रैना याने ट्वीट केले होते की, 'मेरठमधील माझ्या मावशीला ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे. फुफ्फुसांच्या संसर्गामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते." यावर सोनू सूदने त्याला उत्तर दिले की ऑक्सिजन सिलेंडर अवघ्या दहा मिनिटात पोहोचत आहे. यानंतर सुरेश रैनाच्या मावशीला ताबडतोब ऑक्सिजन सिलेंडर मिळाला होता आणि त्याने सोनूचे या मदतीसाठी ट्वीट करत आभार मानले.



तर बॉलिवुड अभिनेत्री नेहा धुपियाने सांगितले की तिच्या एका मित्राला उपचारांसाठी रेमडेसिवीरची आवश्यकता होती, मला या परिस्थितीत मदत करणारं कुणी होतं तर तो फक्त सोनू सूद. सोनूच्या संस्थेने आणखी एक अनमोल जीवन आणि कुटुंब वाचवलंय असं सांगत तिनेही सोनूचे आभार मानले.



सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि बाजारात औषधं सहजरित्या उपलब्ध नसल्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईतील ओशिवारा भागातील लोक सोनू सूदच्या घराबाहेर पोहोचले. सर्व समस्या ऐकल्यानंतर सोनूने शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिलं. मदतीसाठी हात पसरणाऱ्या नागरिकांची सोनूच्या संस्थेकडून मदत करण्यात आली. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही त्याला टॅग करणाऱ्या सर्वांची ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर, रुग्णालयात बेड उपलब्ध करणं, खाण्यापिण्याची, राहायची सोय करणं अशी सर्व प्रकारे मदत सोनूची संस्था करतेय. शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने किंवा खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसलेल्यांसाठी सोनू सूदसारखे लोक देवदूत ठरत आहेत. मागील एका वर्षाहून अधिक काळ सोनू हे काम स्वेच्छेने करतोय आणि देशाला, शासनाला त्याच्या मदतीने मोठा हातभार लाभतोय.