मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आपला वाढदिवस घरातच साजरा करावा लागत आहे. घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई होत आहे. मात्र हेच पोलीस जेव्हा केक घेऊन येतात आणि वाढदिवस साजरा करतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवून देतानाच सर्वसामान्यांच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. असाच एक प्रसंग अंधेरी येथील नागरिकांना अनुभवण्यास मिळाला.
लॉकडाऊनमुळे आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस मुंबई पोलिसांनी साजरा करावा अशी मागणी दूर राहणाऱ्या मुलाने ट्विटर द्वारे पोलिसांना केली आणि पोलिसांनी ही मागणी मान्य कारून आज या वयोवृद्ध महिलेचा जन्मदिवस केक कापून साजरा केला.
मुंबईत कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस 5 मे ला आहे. ती 69 वर्षाची होणार आहे. परंतु त्यांच्याकडे आम्ही तिघा भावांपैकी कोणालाही तेथे जाता येत नसल्याने एका मुलाने चक्क मुंबई पोलिसांना ट्विटर 3 मे ला ट्वीट केलं आणि पोलिसांनी त्या आईचा वाढदिवस आम्ही साजरा करू असे सांगताच त्या मुलांनी मुंबई पोलिस दलाचे आभार मानले.
अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली गुंफा येथील बिंद्रा कॉम्प्लेक्स येथे एक वयोवृद्ध जोडपे राहते. या जोडप्याला तीन मुलं आहेत. त्यातील एक नवी मुंबईत, दुसरा ठाण्यात, तर तिसरा बांद्रा येथे राहतो. या मुलांनी आपण संचारबंदीचे नियम तोडून आई वडिलांचे व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात न घालता मुंबई पोलिसांना विनंती करुन आईचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.
त्यानुसार सोमवारी सायंकाळी त्या मुलाच्या घरी जाऊन केक कापत पोलिसांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीतील नागरिकही यात सहभागी झाले. पोलिसांनी अशा अत्यंत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
संबंधित बातम्या :
सोलापुरात कोरोना रुग्णांच्या सेवेत 'सारथी', रेल्वेकडून रोबोची निर्मिती