Uber Cab: ओला, उबरसारख्या अॅप अॅग्रेगेटर कंपन्यांमुळे दारात कॅब, रिक्षा येत असल्याने अनेकांकडून या सेवेला प्राधान्य दिले जाते. बाहेर फिरायला जातानाही अनेकांकडून कॅबचा वापर केला जातो. मात्र, काही वेळेस  मोक्याच्या क्षण कॅबला उशीर झाल्यास प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईतील एका महिलेला निर्धारीत वेळेत विमानतळ न गाठता आल्याने तिचा विमान प्रवास मुकला. या महिलेला नुकसानभरपाई म्हणून 20 हजार रुपये देण्याचे आदेश मुंबईतील ग्राहक न्यायालयाने (Mumbai Consumer Court) उबर इंडियाला (Uber India) दिले आहेत. 


प्रकरण काय?


हे प्रकरण चार वर्ष जुने आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या अॅड. कविता शर्मा या 12 जून 2018 रोजी सायंकाळी, 5.50 वाजताच्या विमानाने चेन्नईला जाणार होत्या. विमानतळावर पोहचण्यासाठी त्यांनी उबर कॅब बुक केली. हा प्रवास 36 किमी अंतराचा होता. कॅब बुक केल्यानंतर 14 मिनिटानंतर कॅब पोहचली. बुकिंगच्या वेळी दिलेल्या वेळेपेक्षा ही अधिकची वेळ होती. या दरम्यान, कविता या सातत्याने कॅब चालकाला फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. या दरम्यान चालकाचा फोन व्यस्त येत होता. कॅब चालक उशिराने आल्याने कविता यांना विमानतळावर पोहचण्यासाठी 15 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांना विमान प्रवासाला मुकावे लागले. 


अधिक भाडे वसुली


कॅब चालकाने कविता यांच्याकडून अधिक भाडे वसूल केले होते. कॅब बुकिंग करताना त्यांना 563 रुपये इतके भाडे दाखवण्यात आले होते. विमानतळावर पोहचल्यानंतर हे भाडे 703 रुपये झाले. कविता यांनी अधिकचे प्रवास भाडे दिले. मात्र, त्यानंतरही त्यांना विमान प्रवासाला मुकावे लागले. कविता यांनी केलेल्या तक्रारीवर कंपनीने अतिरिक्त 139 रुपये त्यांना पुन्हा दिले. मात्र, कायदेशीर नोटिशीला उत्तर दिले नाही. 


ग्राहक न्यायालयाने काय निर्णय दिला?


या घटनेनंतर अॅड. कविता शर्मा यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर या प्रकरणावर चार वर्षांनी कोर्टाने निकाल सुनावला. या घडल्या प्रकाराबाबत ग्राहक न्यायालयाने उबर इंडियाला फटकारले. ग्राहकाला वेळेत इच्छित स्थळी पोहचवणे आणि योग्य भाडे आकारणी करणे ही उबरची जबाबदारी असल्याचे कोर्टाने म्हटले. ग्राहक न्यायालयाने वेळेवर विमानतळावर न पोहचल्यामुळे झालेल्या मनस्तापासाठी 10 हजार रुपये आणि खटला दाखल केल्याने झालेल्या त्रासासाठी 10 हजार रुपये असे एकूण 20 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.