Mumbai Local Updates : दिवाळीच्या सुट्टीनंतर आजपासून चाकरमानी कामावर परतणार आहेत. मात्र आज सकाळीच चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. अंबरनाथहून (Ambarnath) कर्जतकडे (Karjat) जाणारी लोकलसेवा (Mumbai Local) ठप्प झाली होती. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल सेवा ठप्प झाली होती. तब्बल दीड तासापासून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. अखेर रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दूर करुन रेल्वेची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. 


मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, "S-3 सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी 7.50 वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. 






तांत्रिक बिघाड दूर होऊनही मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं


ऐनन गर्दीच्या वेळी अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ही लोकल बंद पडली होती. रेल्वेच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली. मात्र मध्य रेल्वेचा वेळापत्रक कोलमडलेलं आहे. 


रेल्वेनं तात्काळ दुरुस्त करून ही लोकल पुढे पाठवली. मात्र या तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. सीएसएमटी आणि कर्जतकडे जाणाऱ्या काही लोकल या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदलापूर स्थानकावर सध्या लोकलची वाट बघत प्रवासी ताटकळत उभे आहेत. आता हे वेळापत्रक रुळावर येण्यासाठी किती वेळ लागेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही.


यापूर्वी, शिवाजी सुतार यांनी तांत्रिक बिघाडासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली होती. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "डाऊन मार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान S-3 सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अंबरनाथ-कर्जत सेक्शनवरील लोकल सेवा विलंबानं सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत." 


शिवाजी सुतार यांनी रेल्वे सेवा विलंबानं सुरु असल्याची माहिती ट्वीट करुन दिल्यानंतर काही प्रवाशांनी त्यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला. एका युजरनं म्हटलंय की, "तुम्ही सांगताय लोकल सेवा विलंबानं सुरु आहे. पण ती विलंबान सुरु नसून पूर्णपणे ठप्प झालेली आहे. गेल्या एक तासापासून ट्रेन जागीच उभी आहे."






दरम्यान, रेल्वे प्रशासनानं तात्काळ तांत्रिक बिघाड दूर केला असून लोकल सेवा पूर्ववत झाल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी दिली आहे. अशातच लोकल सेवा पूर्ववत झाली असली तरी लोकल काही काळ विलंबानंच धावत आहेत. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागत आहेत.