Currency Notes : आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Aravind Kejariwal) यांनी चलनी नोटेवर (Currency Notes) महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी देवीचा (Lakshami Devi on Currency Notes) फोटो असावा अशी मागणी केल्यानंतर आता इतर महापुरुषांचा फोटो लावण्याची मागणी होऊ लागली आहे.  भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करून चलनी नोटेवर  छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या फोटोचा वापर करण्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते मनीष तिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात चलनी नोटांवरील फोटोवरून राजकारण तापणार असल्याचे म्हटले जात आहे. 


भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा अशी मागणी करणारे ट्वीट केले. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसह प्रतिकात्म चलनी नोटेचा फोटो ट्वीट केला आहे. 







नितेश राणे यांनी म्हटले की,  एक नागरीक म्हणून माझ्या वैयक्तिक भावना आहेत. पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही. पक्षाचे नेते याबाबत भूमिका मांडतील. छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त भारतातच नाही तर जगभरात मान्यता आहे. त्यांच्याबद्दल प्रेम, आदर आहे. महाराजांचा फोटो चलनी नोटेवर असावा ही माझी भावना व्यक्त केली. चलनी नोटांवरील फोटोंबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने मी माझी भावना व्यक्त केली  असून त्याचा कोणाच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून याबाबतचा निर्णय झाल्यास आनंद वाटेल असेही राणे यांनी म्हटले.  


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी


काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी चलनी नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. चलनी नोटेवर एका बाजूला महात्मा गांधी दुसरीकडे डॉ. आंबेडकर यांचा फोटो असावा अशी मागणी तिवारी यांनी केली आहे. अहिंसा, संविधानवाद आणि समता यांचे प्रतिक असणारे फोटो हे आधुनिक भारताची प्रतिक दाखवतील असेही तिवारी यांनी म्हटले. 






केजरीवाल यांच्यावर भाजपचे टीकास्त्र


दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी देवीचा फोटो असावा अशी मागणी केल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजप नेते आणि हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावर घेरताना म्हटले की, अखेर 'लक्ष्मी'च्या पुजाऱ्याच्या तोंडी सत्य आले अशी बोचरी टीका केजरीवाल यांच्यावर केली. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केजरीवाल हे हिंदूविरोधी असल्याचे म्हटले. केजरीवाल यांनी दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातली होती याची आठवण मालवीय यांनी करून दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: